‘देवगिरी’नंतर आता अंतूर किल्ला परिसरात आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:51 IST2025-04-24T12:50:36+5:302025-04-24T12:51:47+5:30
रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न

‘देवगिरी’नंतर आता अंतूर किल्ला परिसरात आग
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी (दौलताबाद) परिसरात लागलेल्या आगीच्या घटनेची चर्चा अजून थांबलेली नसतानाच बुधवारी रात्री जिल्ह्यातील ऐतिहासिक अंतूर किल्ला परिसरात अचानक आग लागल्याची घटना घडली. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अंतूर हा जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील किल्ला आहे. किल्ल्याच्या परिसरात असलेल्या वनक्षेत्राला रात्री १०:०० वाजेच्या सुमारास आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. ही आग रात्री १२:०० वाजेपर्यंत कायम होती आणि वन विभागाचे कर्मचारी आग शमविण्यासाठी रवाना झाल्याची माहिती देण्यात आली. रात्रीची वेळ आणि वनक्षेत्र असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.
आग किल्ल्यापासून लांब
अभयारण्यास आग लागल्याची माहिती मिळाली असून, ही आग किल्ल्यापासून लांब आहे, कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद गायके यांनी दिली.