लग्नाचे आमिष देऊन अत्याचार; पोलीस प्रशिक्षणार्थी तरुणी पोहोचली पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 13:25 IST2020-12-07T13:18:24+5:302020-12-07T13:25:14+5:30
या काळात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने तक्रार नोंदविली.

लग्नाचे आमिष देऊन अत्याचार; पोलीस प्रशिक्षणार्थी तरुणी पोहोचली पोलीस ठाण्यात
औरंगाबाद : पोलीस प्रशिक्षण स्पर्धा परीक्षेसाठी शहरात आलेल्या एका तरुणीच्या मजबुरीचा फायदा घेत एका परधर्मीय तरुणाने आर्थिक मदत करीत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्न करण्याचे आमिष दाखवून सलग तीन वर्षे तिचे लैंगिक शोषण केले व शेवटी तू काळी आहेस, तुझ्यात आता मला रस नाही, असे म्हणत लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तरुणीने सिडको ठाण्यात त्या तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली.
घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे बी.ए. द्वितीय वर्षांपर्यंत शिक्षण घेऊन एक २९ वर्षीय तरुणी स्पर्धा परीक्षेसाठी औरंगाबादेत आली. ती मैत्रिणींसोबत किरायाच्या खोलीत राहत होती. अचानक एके दिवशी तिच्या गावाजवळचा ओळखीचा शेख शाकीर शेख कासीम (वय ३०) हा तिला टीव्ही सेंटर चौकात भेटला. तो येथील पोलीस प्रशिक्षण संस्थेत पोलीस भरतीची तयारी करतो. त्यानंतर त्यांची नेहमी भेट होत राहिली व पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याने तिला पोलीस भरतीची तयारी करण्याचा सल्ला देऊन रोज तिची मैदानावर तयारी घेऊ लागला. तयारी करताना अंगाला जाणीवपूर्वक स्पर्श करत असतानाही तिने त्याकडे दुर्लक्ष केले.
ऑक्टोबर २०१७ मध्ये ही तरुणी गावाकडून परत आल्यानंतर त्याने तिला प्रपोज केले. तिने नकार देताच त्याने आत्महत्येची धमकी दिली. याशिवाय त्याने लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे तिने त्याला होकार दिला. त्यानंतर ते दोघे टीव्ही सेंटर, साई मंदिराजवळ खोली घेऊन पती-पत्नीसारखे राहू लागले. त्याने तिथे वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्न करण्याची आठवण दिल्यानंतर तो सतत टाळत असे. त्यामुळे दोघांत भांडण झाले व ती गावी निघून गेली. एक महिन्यानंतर शाकीरने फोन करुन अभ्यासासाठी औरंगाबादला येण्यास सांगितले. इथे आल्यावर त्याने गोदावरी शाळा परिसरात खोली भाड्याने घेतली व ते दोघे तिथे दोघे राहू लागले. या काळात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने तक्रार नोंदविली. या प्रकरणी महिला फौजदार आबूज तपास करीत आहेत.
लग्नास नकार, ‘ती’ पोहोचली पोलीस ठाण्यात
सन २०१७ ते एप्रिल २०२० पर्यंत सलग तीन वर्षे ते दोघे ‘रिलेशनशिप’मध्ये राहिले व शाकीरने तिचे लैंगिक शोषण केले. मे महिन्यात तिने पुन्हा लग्नासाठी त्याच्याकडे तगादा लावला. तेव्हा त्याने शिवीगाळ करून तिला मारहाण केली. तू मला आता आवडत नाही. तू काळी आहेस. तुझ्यात मला रस नाही, असे म्हणून लग्नास नकार दिला. शेवटी आपली फसवणूक केल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत धाव घेतली.