Video: समृद्धी महामार्गावर अपघाताच्या मालिकेनंतर आता तर गोळीबार; पहा नेमकं काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 14:05 IST2022-12-14T14:01:57+5:302022-12-14T14:05:37+5:30
समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होताच २४ तासांच्या आत महामार्गाच्या पहिल्या टोल नाक्यावर पहिला अपघात झाला होता. त्यानंतर आता गोळीबाराची घटना पुढे आली आहे.

Video: समृद्धी महामार्गावर अपघाताच्या मालिकेनंतर आता तर गोळीबार; पहा नेमकं काय घडलं
औरंगाबाद:समृद्धी महामार्गावर रोज अपघाताच्या घटना पुढे येत असताना आता सावंगी जवळील बोगद्याजवळ एका तरुणाने हवेत गोळीबार केल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्राची भाग्य रेषा म्हणून समृद्धी महामार्गाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले आहे. मात्र, यावरील प्रवासापेक्षा इतर घटनांमुळेच महामार्ग चर्चेत येत आहे. कधी बैलगाड्या महामार्गावर धावत आहे, तर कुठे हरण पळत आहे. शिवाय महामार्ग सुरु झाल्यापासून यावर रोज अपघाताच्या घटना घडत आहेत. आता तर महामार्गावर एका तरुणाने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. याबद्दलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तरुण उभा असलेल्या ठिकाणी पाठीमागे एक बोगदा दिसतोय. यावरून हा व्हिडीओ औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी भागातील असल्याचा अंदाज आहे. हा तरुण हातात गन घेऊन महामार्गावर मध्येच उभा आहे. जीपसमोर उभा राहून तो हवेत गोळीबार करत असल्याचे दिसून येत आहे.
महार्गावर बैलगाडी, रोज अपघात आता गोळीबार
समृद्धी महामार्गावर चालणाऱ्या बैल गाड्यांच्या ताफ्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. त्यानंतर महामार्गावर दोन हरण, साप, माकडे जात असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
'समृद्धी'वर आणखी एक अपघात
समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होताच २४ तासांच्या आत महामार्गाच्या पहिल्या टोल नाक्यावर पहिला अपघात झाला ज्यात एका कारने समोरील दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेला २४ तास होत नाहीत तोच बुलढाण्यातील ही दुसरी घटना घडलीये.