दीर्घ प्रतीक्षेनंतर छत्रपती संभाजीनगरकरांना मिळणार अतिरिक्त २६ एमएलडी पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:15 IST2025-08-06T16:05:58+5:302025-08-06T16:15:01+5:30
फारोळ्यातील नवीन जलशुद्धीकरण केंद्राची आजपासून चाचणी

दीर्घ प्रतीक्षेनंतर छत्रपती संभाजीनगरकरांना मिळणार अतिरिक्त २६ एमएलडी पाणी
छत्रपती संभाजीनगर : शहरात नागरिकांना आठ ते दहा दिवसांनंतर पाणी मिळत आहे. पाणीपुरवठ्याचे दिवस कमी व्हावेत म्हणून २०० कोटी रुपये खर्च करून ९०० मिमी व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी मागील वर्षी टाकली. मात्र, यासाठी लागणारे जलशुद्धीकरण केंद्रच उभारले नव्हते. नुकतेच जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले. बुधवार, दि. ६ ऑगस्टपासून जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी घेण्यात येणार आहे. लवकरच शहराला अतिरिक्त २६ एमएलडी वाढीव पाणी मिळेल. दहा दिवसाला मिळणारे पाणी किमान पाचव्या किंवा सहाव्या दिवशी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
२७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामाला विलंब होत असल्याने मागील वर्षी युद्धपातळीवर ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी जायकवाडी ते नक्षत्रवाडी पंप हाऊसपर्यंत टाकण्यात आली. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला (मजीप्रा) जलवाहिनीसह २६ एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा विसर पडला होता. अलीकडेच याचे काम पूर्ण केले. फारोळा येथील नवीन आणि जुन्या जलशुद्धीकरण केंद्राला जोडणी देण्यात आली. सोमवारी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी घेण्यात आले. बुधवारपासून चाचणी सुरू होईल. त्यात काही त्रुटी असतील तर लगेचच दुरुस्त केल्या जातील, अशी माहिती मजीप्रातर्फे देण्यात आली. किमान आठ दिवस तरी टेस्टिंग सुरू राहील. त्यानंतर शुद्ध केलेले पाणी शहराला मिळेल.
२६ एमएलडी पाणी वाढेल
सध्या शहराला ७००, ९०० आणि १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे १४० एमएलडी पाणी मिळत आहे. नवीन जलशुद्धीकरण केंद्रामुळे त्यात २६ एमएलडी पाण्याची वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. १६० ते १६५ एमएलडी पाणी दररोज शहराला मिळाले, तर दहा दिवसाने येणारे पाणी किमान पाचव्या किंवा सहाव्या दिवशी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहराला सध्या २५० एमएलडी पाण्याची गरज आहे.