किरकोळ कारणावरून वकील पिता-पुत्रास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:10 IST2019-02-14T00:10:20+5:302019-02-14T00:10:31+5:30
दुचाकीचा कट का मारला याचा जाब विचारणाऱ्या वकील पिता-पुत्रास मारहाण करून दुचाकी व घराची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी रात्री साऊथसिटीत घडली. या प्रकरणी ११ जणांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरकोळ कारणावरून वकील पिता-पुत्रास मारहाण
वाळूज महानगर : दुचाकीचा कट का मारला याचा जाब विचारणाऱ्या वकील पिता-पुत्रास मारहाण करून दुचाकी व घराची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी रात्री साऊथसिटीत घडली. या प्रकरणी ११ जणांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साऊथसिटी येथे राहणारे अॅड. कमलाकर तांदुळजे यांचा मुलगा शुभम हा मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास साऊथसिटीतून जात असताना त्यास दुचाकीवरून आलेल्या सुनील गाडे याने कट मारला. यावेळी शुभम याने कट का मारला असा जाब विचारला असता सुनीलने मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार लक्षात येताच अॅड. तांदुळजे सुनीलला समजावण्यास गेले. तेव्हा सुनील व त्याच्यासोबत असलेल्या संतोष आडे, सोमीनाथ तुपे, संतोष गाडे, विजय शिनगारे, ज्ञानेश्वर काळे, अनिल गाडे, संगीता गाडे, सुभाष गाडे, अजय गाडे, संगीता हिचे वडील व इतर दोन ते तीन अनोळखी इसमांनी दोघा पिता-पुत्रास शिवीगाळ करून मारहाण केली.
या मारहाणीमुळे घाबरलेल्या पिता-पुत्राने रामदास लाभर याच्या घरी आश्रय घेतला. उपरोक्त सर्वांनी लाभर यांच्या घरात घुसून त्यांना पुन्हा मारहाण केली. यानंतर काही वेळानंतर आरोपींनी अॅड. तांदुळजे यांचे घर गाठून पुन्हा वाद घालत मारहाण करीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी व स्कुटीची लाकडी दांड्याने तोडफोड करून घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या. याप्रकरणी अॅड. तांदुळजे यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.