धक्कादायक! पनवेल मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांवर छत्रपती संभाजीनगरात बलात्काराचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:32 IST2025-07-30T11:30:51+5:302025-07-30T11:32:49+5:30
३९ वर्षीय महिलेची तक्रार, तीन वेळा गर्भपात केल्याचाही आरोप

धक्कादायक! पनवेल मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांवर छत्रपती संभाजीनगरात बलात्काराचा गुन्हा
छत्रपती संभाजीनगर : प्रेमसंबंध प्रस्थापित करून लग्नाचे आमिष दाखवत ३९ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त भारत प्रभाकर राठोड यांच्यावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बलात्कारासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा कामगार चौकातील बलात्काराच्या घटनास्थळाचा फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून पंचनामा सुरू होता.
३९ वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, २०१६ मध्ये तिची आरोपी राठोड यांच्याशी ओळख झाली होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर राठोड यांनी तिला वारंवार लग्नाचे आमिष दाखवून कामगार चौकातील एका अपार्टमेंटमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले. २०१६ पासून ते सप्टेंबर २०२४ पर्यंत भारत यांनी तक्रारदार महिलेसोबत वारंवार नैसर्गिक तसेच अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेच्या तक्रारीतील आरोपानुसार, या दरम्यान ती तीन वेळा गर्भवती राहिल्यावर तिचा गर्भपात करण्यात आला.
या सर्व घटनेत आरोपीचे नातेवाईक विशाल राठोड व राहुल (रा. उदगीर, जि. लातूर) यांनी मदत केल्यामुळे, अतिरिक्त आयुक्त भारत यांच्यासह विशाल व राहुल यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. "भारत राठोड यांनी मला लग्नाचे आश्वासन देत स्वतः उच्च पदावर असल्याचे कारण देऊन धमकी दिली, त्यामुळे तक्रार देण्यास मी टाळाटाळ करत होते," असे तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.