आदर्श बँक घोटाळा प्रकरण: अखेर सुनील मानकापे दीड वर्षानंतर येणार तुरुंगाबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 19:59 IST2025-03-26T19:50:14+5:302025-03-26T19:59:33+5:30
सुनील मानकापे आदर्श महिला नागरी सहकारी बँक येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. त्यावेळी बनावट कर्जधारकांच्या नावे कर्ज उचलून रक्कम स्वतःच्या संस्थांमध्ये वर्ग करून लाभ घेतला, असे आरोप त्याच्यावर आहे.

आदर्श बँक घोटाळा प्रकरण: अखेर सुनील मानकापे दीड वर्षानंतर येणार तुरुंगाबाहेर
छत्रपती संभाजीनगर : राज्यभर गाजत असलेल्या आदर्श घोटाळ्यातील आरोपी सुनील मानकापे याला औरंगाबाद जिल्हा महिला आदर्श नागरी सहकारी बँक घोटाळाप्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय वाघवसे यांनी नियमित अटी व शर्तींवर मंगळवारी जामीन मंजूर केला. आदर्श ग्रुपच्या विविध घोटाळ्यांमध्ये सुनील मानकापे याच्याविरुद्ध एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ४ गुन्ह्यांमध्ये त्याला जामीन मिळाला आहे. केवळ एका गुन्ह्यात जामीन मिळाला नसल्यामुळे तो तुरुंगात आहे. खंडपीठाने जामीन दिल्यामुळे तो दीड वर्षानंतर तुरुंगाबाहेर येईल.
सुनील मानकापे आदर्श महिला नागरी सहकारी बँक येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. त्यावेळी बनावट कर्जधारकांच्या नावे कर्ज उचलून रक्कम स्वतःच्या संस्थांमध्ये वर्ग करून लाभ घेतला, असे आरोप त्याच्यावर आहे. सत्र न्यायालयाकडून जामीन न मिळाल्याने त्याने औरंगाबाद खंडपीठ येथे ॲड. संभाजी टोपे यांच्यामार्फत नियमित जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपी मागील एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून तुरुंगामध्ये आहे. या प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल झाले आहे. तसेच आता त्याच्याकडून कोणतीही माहिती घेणे बाकी नाही, असे निदर्शनास आणून देण्यात आले. मानकापे परिवाराची संपूर्ण मालमत्ता तपास अधिकाऱ्यानी जप्त केली आहे. अर्जदार सुनीलकडे कुठल्याही प्रकारची मालमत्ता शिल्लक नाही. असेही सांगण्यात आले. या सर्व बाबींचा विचार करून उच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. आरोपीच्या वतीने ॲड. संभाजी टोपे व ॲड. सार्थक माने यांनी बाजू मांडली.