'आधी परीक्षा नंतर एजन्सीवर कारवाई'; टोपेंनी सांगितले परीक्षा रद्द करण्यामागचे नेमकं कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 15:20 IST2021-09-26T15:16:02+5:302021-09-26T15:20:53+5:30
Rajesh Tope News : सर्व विभागांचे म्हणणे जाणूनच घेतला परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

'आधी परीक्षा नंतर एजन्सीवर कारवाई'; टोपेंनी सांगितले परीक्षा रद्द करण्यामागचे नेमकं कारण
औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरतीची परीक्षा तशीच घेतली असती तर हजारो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले असते. सर्व विभागांचे म्हणणे जाणून घेतले आणि त्यानंतरच परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आधी ही परीक्षा घेतली जाईल आणि नंतर संबंधीत एजन्सीवर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope ) म्हणाले.
जिल्हा रुग्णालयात रविवारी आढावा बैठकीनंतर टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पदभरतीच्या परीक्षेविषयी टोपे यांना विचारण्यात आले. तेव्हा टोपे म्हणाले, परीक्षा पुढे ढकलणे ही काही अशक्य गोष्ट नसते. परीक्षा मोठी आहे. परीक्षेसाठी चार, आठ दिवस वाढवून देण्याची गरज असेल तर दिले पाहिजे. त्याने काही फरक पडणार नाही. पण तशीच परीक्षा घेतली असती तर हजारो मुले परीक्षेला मुकले असते, मंग त्याला कोण दोषी राहिले असते, असा प्रश्न टोपे यांनी उपस्थित केला.
आरोग्य विभागाच्या गट - क आणि गट - ड संवर्गातील पदभरतीसाठी २५ आणि २६ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु परीक्षेच्या नियोजनाचेच ‘आरोग्य’ बिघडले आणि प्रवेशपत्र एकाचे आणि छायाचित्र दुसऱ्याचे, प्रवेशपत्र न मिळणे असे प्रकार पाहायला मिळाले. शुक्रवारी रात्री उशिरा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.