पोलिसांना चकवा; बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी भर रस्त्यावरून हातकडीसह पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 14:19 IST2025-02-26T14:18:50+5:302025-02-26T14:19:05+5:30

लघुशंकेचे नाटक करत भर रस्त्यावरून हातकडीसह पोबारा

Accused of the crime of rape walked out of the street with handcuffs | पोलिसांना चकवा; बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी भर रस्त्यावरून हातकडीसह पसार

पोलिसांना चकवा; बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी भर रस्त्यावरून हातकडीसह पसार

छत्रपती संभाजीनगर : बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झालेल्या प्रियकराने लघुशंकेचे नाटक करत भर रस्त्यावरून हातकडीसह पोबारा केला. मंगळवारी सायंकाळी अयोध्या मैदानासमोर भर रस्त्यावर ही घटना घडली. तुषार किसन करपे (२३, रा. विरमगाव, फुलंब्री) असे आरोपीचे नाव आहे.

२२ वर्षीय तरुणीने त्याच्याविरोधात वेदांतनगर पोलिसांकडे तक्रार केली होती. फेब्रुवारी, २०२४ मध्ये धुळ्यात असताना तिची मेसचे डबे पुरवणाऱ्या तुषारसोबत ओळख झाली होती. त्यानंतर तरुणी पदमपुऱ्यात स्थायिक झाली. त्या दरम्यान मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तुषारने तिला लग्नाचे आमिष दाखवत मे, २०२४ मध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून नंतर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरू केले. ४ नोव्हेंबर रोजी तरुणीला धमकावून लग्नासाठी पळून नेले. तेव्हा कुटुंबाच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर ठाण्यात तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.

गुन्ह्यानंतर अटक
तक्रार झाल्याने तुषार दोन दिवसांत तरुणीसह ठाण्यात हजर झाला. तेव्हा त्याच्या दबावामुळे मी पोलिसांना खोटा जबाब दिल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितले. त्यानंतरही त्याने अत्याचार केले. सोशल मीडियावरील अकाऊंट हॅक करून बदनामी केली. मुलीने याबाबत वेदांतनगरच्या निरीक्षक प्रविणा यादव यांच्याकडे तक्रार केली. बलात्कार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होताच तुषारला सोमवारी अटक झाली. ॲट्रॉसिटीच्या कलमामुळे सहायक आयुक्त संपत शिंदे यांच्याकडे गुन्ह्याचा तपास गेला.

लघुशंकेचे नाटक, हाताला झटका देऊन पसार
तुषारला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सायंकाळी अंमलदार त्याला वेदांतनगर ठाण्यात घेऊन आले. ५.३० वाजता त्याची घाटीत तपासणी करायची होती. अंमलदार प्रवीण मुळे त्यासाठी आवश्यक कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी शिंदे यांच्या कार्यालयात गेले. त्या दरम्यान अंमलदार पी. जी. नागरे, चालक जारवाल दोन होमगार्डसह तुषारला घेऊन घाटीकडे निघाले. ठाण्यातून निघाल्यानंतर काहीच मिनिटांत तुषारने लघुशंकेचे नाटक केले. जारवाल यांनी अयोध्या मैदानासमोर गाडी थांबवली. तेथे तुषारने नागरेंच्या हाताला झटका देत हातकडीसह मैदानावरून सुसाट पोबारा केला. अन्य तिघांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, तो हाती लागला नाही. रात्री उशिरापर्यंत वेदांतनगर पोलिसांसह गुन्हे शाखेची दोन पथके त्याचा शोध घेत होती.
छायाचित्र

 

Web Title: Accused of the crime of rape walked out of the street with handcuffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.