अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 19:40 IST2018-10-22T19:39:39+5:302018-10-22T19:40:38+5:30
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास बेगमपुरा पोलिसांनी जेरबंद केले.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत
औरंगाबाद : अल्पवयीन मुलीला बडीशोप देण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवर बसवून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास बेगमपुरा पोलिसांनी जेरबंद केले. न्यायालयाने आरोपीला २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
रवी सुखदेव मगरे (३३,रा. जुना बायजीपुरा, संजयनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. बेगमपुरा पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा बांधकाम मिस्तरी आहे. तो पहाडसिंगपुरा येथील एका इमारत बांधकामासाठी जातो. त्याच इमारतीच्या बांधकामासाठी मध्य प्रदेशातून आलेले दाम्पत्य त्यांच्या १४ वर्षीय मुलीसह राहते. तिच्यासोबत झालेल्या ओळखीतून आरोपीने बडीशोप देण्याचे आमिष दाखवून ३० सप्टेंबर रोजी मोटारसायकलवर बसवून पळवून नेले होते. त्यानंतर ४ आॅक्टोबरपर्यंत त्याने तिला त्याच्या घरात डांबून ठेवले. तेथे तिच्यावर त्याने अत्याचार केले.
दुसऱ्या दिवशी आरोपीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत पीडितेने घर गाठले आणि नंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. घटनेपासून पसार आरोपीचा शोध बेगमपुरा पोलीस घेत होते. बेगमपुरा ठाण्यातील सहायक निरीक्षक विनोद बदक, कर्मचारी सय्यद शकील, सूर्यवंशी यांनी १९ आॅक्टोबर रोजी रात्री त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.