अपघातग्रस्त गॅस टँकरचा चालक अवघ्या २२ वर्षांचा; जखमी अवस्थेत गेला पुण्याच्या रुग्णालयात

By सुमित डोळे | Published: February 3, 2024 04:14 PM2024-02-03T16:14:41+5:302024-02-03T16:15:02+5:30

 चालकाचा वाहन परवाना, मोबाइल टँकरच्या केबिनमधून जप्त

Accidental Gas Tanker Driver Just 22 Years Old; Injured, he went to Pune hospital | अपघातग्रस्त गॅस टँकरचा चालक अवघ्या २२ वर्षांचा; जखमी अवस्थेत गेला पुण्याच्या रुग्णालयात

अपघातग्रस्त गॅस टँकरचा चालक अवघ्या २२ वर्षांचा; जखमी अवस्थेत गेला पुण्याच्या रुग्णालयात

छत्रपती संभाजीनगर : तब्बल १४ तास शहर वेठीस धरणाऱ्या गुरुवारच्या अपघातात झारखंडचा अवघा २२ वर्षांचा फिरदोस ताज महंमद अन्सारी धोकादायक गॅस टँकर चालवत होता. अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असतानाही तो जखमी अवस्थेत पळून गेला. टँकरमध्ये सापडलेल्या वाहन परवाना आणि मोबाइलवरून पोलिसांनी त्याच्या नातेवाइकाला संपर्क केला. पोलिस लवकरच फिरदाेसची चाैकशी करू शकतात. त्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.

सिडको उड्डाणपुलाजवळ गुरुवारी पहाटे ५:१३ वाजता झालेल्या गॅस टँकरच्या अपघातानंतर शहराने पहिल्यांदाच गॅस गळतीचे परिणाम अनुभवले. प्रशासनदेखील यामुळे हादरून गेले होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे उभारण्यात आलेल्या शिल्पाचे यात नुकसान झाले. सरकारी पक्षातर्फे सिडको पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे यांच्या फिर्यादीवरून चालक फिरदोसविरुद्ध भादंवि २७९, २८५, सहकलम १३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी सांगितले. सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, अपघातानंतर फिरदोस जखमी अवस्थेत पुणे जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांचा कंपनीला पत्रव्यवहार : 
सिडको पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपास सुरू केला आहे. शुक्रवारीच एचपीसीएल कंपनीला पत्रव्यवहार करून ७ मुद्द्यांवर प्रश्न विचारले आहेत.
-टँकर नेमका कोठून येत होता?
-चालकाची नियुक्ती कोणी केली?
-टँकरमध्ये किती रसायन होते?
-रसायन कुठल्या प्रकारचे होते?
- त्याची जबाबदारी कोणाची आहे?

या अनुषंगाने पोलिसांनी कंपनीला प्रश्न विचारले असून कंपनीने उत्तरे दिल्यानंतर घटनेचे चित्र आणखी स्पष्ट होईल, असेही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Accidental Gas Tanker Driver Just 22 Years Old; Injured, he went to Pune hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.