सिल्लोडच्या शिवसेना उपशहरप्रमुखांचा अपघाती मृत्यू; नातेवाईकांचा घातपाताचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 18:09 IST2019-06-22T18:02:10+5:302019-06-22T18:09:41+5:30
उपशहरप्रमुख शुक्रवारी दिवसभर घरी परतले नव्हते

सिल्लोडच्या शिवसेना उपशहरप्रमुखांचा अपघाती मृत्यू; नातेवाईकांचा घातपाताचा संशय
सिल्लोड (औरंगाबाद ) : शहरातील शिवसेनेचे उपशहरप्रमुख सचिन शांतिलाल अग्रवाल ( ३७ ) यांचा शनिवारी (दि.२२) सकाळी शहरातील एका पुलाखाली मृतदेह आढळून आला. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय अग्रवाल यांच्या नातेवाईकांचे व्यक्त केला आहे. याबाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरु आहे.
सिल्लोड शहरातील शिवसेना उपशहरप्रमुख सचिन अग्रवाल हे शुक्रवारी रात्री घरातून बाहेर पडले होते मात्र रात्रभर ते घरी आले नाही त्यातच शनिवारी सकाळी शहराजवळील औरंगाबाद नाका नजिकच्या पुलाखाली ते त्यांच्या दुचाकीसह बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. नागरिकांच्या माहितीनंतर सपोनी तांबे हे सहकाऱ्यासहित घटनास्थळी दाखल झाले. अग्रवाल यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,व्यापारी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.सचिन अग्रवाल यांच्या पश्च्यात पत्नी, मूल, आई, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी सिल्लोड़ शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नातेवाईकांच्या आरोपानंतर पुढील तपास करत आहेत.