श्वानाला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात; दुचाकीवर दुचाकी धडकून २ मित्र ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 13:38 IST2020-09-10T13:36:59+5:302020-09-10T13:38:00+5:30
आकाशवाणी चौक ओलांडत असताना मोटारसायकलसमोर श्वान आडवा आला. श्वानाला वाचविण्यासाठी त्यांनी दुचाकीला ब्रेक लावला.

श्वानाला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात; दुचाकीवर दुचाकी धडकून २ मित्र ठार
औरंगाबाद : दोन दुचाकीत मंगळवारी रात्री आकाशवाणी चौकात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चार जणांपैकी दोन तरुण ठार झाले. या घटनेची नोंद जवाहरनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली.
सय्यद आवेज सय्यद गाझी (२३, रा. जलाल कॉलनी) आणि सय्यद सद्दाम सय्यद चाँद (२७, रा. संजयनगर), अशी मयतांची नावे आहेत. याविषयी प्राप्त माहिती अशी की, सय्यद आवेज आणि सय्यद सद्दाम हे दोन मोटारसायकलवरून अन्य दोन मित्रांसह रात्री ११ वाजेच्या सुमारास सिडकोकडून मोंढा नाक्याकडे जात होते. आकाशवाणी चौक ओलांडत असताना आवेजच्या मोटारसायकलसमोर श्वान आडवा आला. श्वानाला वाचविण्यासाठी त्यांनी दुचाकीला ब्रेक लावला. यावेळी त्यांच्यामागून आलेला दुचाकीस्वार सद्दाम त्यांना मागून जोरात धडकला.
या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीवरील चौघे जखमी झाले. यापैकी आवेज आणि सद्दाम गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक उपनिरीक्षक दत्तात्रेय बोटके आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटविली आणि थांबलेली वाहतूक सुरळीत केली. अपघातानंतर त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना आवेज आणि सद्दामचा पहाटे ४ वाजता मृत्यू झाला. या घटनेची नोंद जवाहरनगर ठाण्यात करण्यात आली. मयत आवेज जुनाबाजार येथील एका गॅरेजवर काम करीत होता, तर सद्दाम स्वत:चा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.