विद्यापीठात एसीबीचा ट्रॅप यशस्वी; निवृत्त महिला कर्मचाऱ्याकडून लाच घेताना २ कर्मचारी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 18:47 IST2025-04-24T18:46:37+5:302025-04-24T18:47:31+5:30
महिला सफाई कर्मचाऱ्याच्या वेतन फरकासाठी लाच घेणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना एसीबीच्या पथकाकडून रंगेहाथ अटक

विद्यापीठात एसीबीचा ट्रॅप यशस्वी; निवृत्त महिला कर्मचाऱ्याकडून लाच घेताना २ कर्मचारी अटकेत
छत्रपती संभाजीनगर - विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळवून देण्याच्या बहाण्याने १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज रंगेहाथ अटक केली. या कारवाईने विद्यापीठ व उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
सदर महिला कर्मचारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून सफाई कामगार पदावरून निवृत्त झाल्या असून, त्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची एकूण ३ लाख ६३ हजार ६१९ रुपये रक्कम मिळणे बाकी आहे. या रकमेच्या मंजुरीसाठी सहाय्य करण्याच्या बदल्यात विद्यापीठातील शिपाई रुपचंद बाबुलाल मुंगसे (वय ५४) आणि दीपक नंदकिशोर रॉय (वय ५९) या दोघांनी निवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाकडे १८ हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधल्यानंतर, पोलिस निरीक्षक अमोल धस यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी विद्यापीठ परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी दीपक रॉय याने तक्रारदाराकडून पंचासमक्ष १८ हजार रुपये घेताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव, व पोलिस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिस अंमलदार हिवाळे यांनी या कारवाईत सहकार्य केले. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, त्यातून आणखी कोणकोणाचे नाव समोर येते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.