छत्रपती संभाजीनगर : शासकीय योजनेच्या व्यावसायिक कर्जाचे थकित हप्ते प्रकरणात उपनिबंधकांची कारवाई थांबवून मुदतवाढ देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या खासगी लिपिक सागर कारभारी जाधव (३२, रा. वैजापूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. बुधवारी सायंकाळी कारवाई करुन त्याच्यावर रात्री रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
३५ वर्षीय तरुणाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजने अंतर्गत देवगिरी बँकेमधून व्यावसायासाठी पाच लाखांचे कर्ज घेतले आहे. कर्जाचे हप्ते थकल्यामुळे देवगिरी बँकेने त्याच्यावर कारवाईची नोटीस जारी केली. याची कारवाई करणारे अधिकारी पुढे उपनिबंधक कार्यालयात (परसेवा) आहेत. सहकार खात्याशी संबंधितच मराठवाडा अर्बन बँक को-ऑपरेटिव्ह असोसिएशनमध्ये कार्यरत सागरने तक्रारदाराला कारवाई टाळून हफ्त्याला मुदत वाढ देण्यासाठी १२ हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी २ हजार रुपये आधीच ऑनलाइन स्वीकारले होते. उर्वरित दहा हजारांसाठी त्याने लावलेल्या तगाद्याला कंटाळून तरुणाने एसीबी अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे तक्रार केली. पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांच्या तपासात जाधव लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवारी दुपारी रोपळेकर चौकात सापळा रचण्यात आला. मात्र, तपोवन रेल्वेने वैजापूरला जायचे असल्याने जाधव निघून गेला.
'मीच साहेब आहे, दे पटकन पैसे'जाधवने उर्वरित दहा हजारांसाठी तक्रारदाराला रेल्वेस्थानकावर बोलावले. उपअधीक्षक संगिता पाटील, पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, अंमलदार राजेंद्र नंदिले, सचिन बारसे, सी. एन. बागुल यांनी रेल्वेस्थानकावर सापळा रचला. आरोपी जाधव पत्नीसह रेल्वेत बसला होता. तक्रारदार त्याच्याशी खिडकीतून संवाद साधत होता. रेल्वे निघायची वेळ होताच जाधवने ‘मीच साहेब आहे, कारवाई होणार नाही’ म्हणत त्याच्याकडून दहा हजार रुपये घेतले. तेवढ्यात गुसिंगे यांनी डब्यात चढून त्याच्या पत्नीसमक्ष त्याला अटक केली.
नियुक्तीपत्रच नाही, तरीही लिपिकजाधव मराठवाडा अर्बन बँक को ऑपरेटिव्ह असोसिएशन लि. येथे कनिष्ठ लिपिक म्हणवला जातो. मात्र, त्याची तेथे अधिकृत नियुक्तीच नाही. त्याचा बँकेकडे नोकरीसाठी केवळ अर्ज असून त्याच्या नावाचे नियुक्तीपत्र मात्र नाही. तरीही तेथे स्वतंत्र टेबलवर तो लिपिक म्हणुन बसून उपनिबंधकाच्या नावाने कामे करण्याचे आश्वासन देत होता.
Web Summary : Aurangabad: A clerk, Sagar Jadhav, was arrested for accepting a ₹12,000 bribe to extend loan repayment deadlines. ACB caught him on a train, taking money from the complainant in front of his wife.
Web Summary : औरंगाबाद: सागर जाधव को ऋण अदायगी की समय सीमा बढ़ाने के लिए ₹12,000 की रिश्वत लेते हुए गिरफ्तार किया गया। एसीबी ने उसे ट्रेन में शिकायतकर्ता से उसकी पत्नी के सामने पैसे लेते हुए पकड़ा।