शेतकऱ्याने गमछा खांद्यावरून काढताच एसीबीची झडप; लाचखोर कोतवालासह तलाठीही अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:00 IST2025-08-05T14:59:01+5:302025-08-05T15:00:12+5:30
शेतकऱ्याचा पैशांसाठी छळ; पैठण तहसील कार्यालयात एसीबीची कारवाई

शेतकऱ्याने गमछा खांद्यावरून काढताच एसीबीची झडप; लाचखोर कोतवालासह तलाठीही अटकेत
छत्रपती संभाजीनगर : शेतजमिनीचे वाटणीपत्र तयार करून देण्यासाठी १० हजारांची लाच मागणारा कोतवाल व तलाठी, असे दाेघे एकाच वेळी एसीबीच्या सापळ्यात अडकले. सोमवारी दुपारी पैठण तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत तलाठी अक्षय बबनराव बिनीवाले (३०, रा. म्हाडा कॉलनी, पैठण) व कोतवाल सोमनाथ राघू कोल्हे (३६, रा. आपेगाव) यांना अटक केली.
तक्रारदाराची पैठण तालुक्यातील अगर नांदूरमध्ये गट क्रमांक ५८ मध्ये ५० आर सामायिक शेतजमीन आहे. त्यापैकी तक्रारदाराच्या नावे १६ आर जमीन आहे. २५ जुलै रोजी त्यांनी जमिनीच्या वाटणीपत्रासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्याच्यावर नंतर काहीच कारवाई झाली नाही. १ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने कोल्हेकडे विचारणा केली. तेव्हा वाटणीपत्र करून देण्यासाठी त्याने बिनीवालेच्या नावाने १० हजारांच्या लाचेची मागणी केली. शेतकऱ्याने एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे तक्रार केली. कांगणे यांनी पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांना खातरजमा करून कारवाईच्या सूचना केल्या.
गमछा खांद्यावरून काढताच झडप
निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, धर्मराज बांगर यांनी खातरजमा केली. त्यात कोल्हेने तडजोडीअंती ८ हजारांची मागणी केली. शिवाय, कोल्हेने बिनीवालेला कॉल करून याबाबत विचारणादेखील केली. कोल्हेने पैसे घेतल्यावर खांद्यावरचा गमछा खाली उतरवण्याचा इशारा ठरला होता. ठरल्याप्रमाणे दुपारी ४ वाजता तक्रारदाराने कोल्हेच्या हातात पैसे टेकवले आणि गमछा उतरवला. तेथेच दबा धरून बसलेल्या गुसिंगे, बांगल, अंमलदार राजेंद्र नंदिले, युवराज हिवाळे, सी.एन. बागुल यांनी धाव घेत त्याला रंगेहाथ ताब्यात घेत बिनीवालेलादेखील अटक केली. दोघांवरही पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.