मुबलक पाणी, नळांना मीटरसोबत छत्रपती संभाजीनगरकरांना येणार भरभक्कम पाणीपट्टी
By मुजीब देवणीकर | Updated: July 2, 2024 18:59 IST2024-07-02T18:59:07+5:302024-07-02T18:59:44+5:30
नवीन पाणीपुरवठा योजनेचे डिसेंबर २०२४ पर्यंत काम पूर्ण होईल, असा दावा

मुबलक पाणी, नळांना मीटरसोबत छत्रपती संभाजीनगरकरांना येणार भरभक्कम पाणीपट्टी
छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी २,७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत योजनेचे काम पूर्ण होईल, असा दावा केला जात असला तरी मार्च २०२५ पर्यंत पाणी शहरात येण्याची शक्यता आहे. नागरिकांना दररोज २४ तास पाणी मिळेल, सोबतच नळांना मीटरही लावले जाईल. पाणीपट्टीही भरभक्कम राहणार असून, पूर्वीप्रमाणे ४ हजार ५० रुपये वसूल केले जाण्याची दाट शक्यता आहे.
डिसेंबर अखेर किंवा जानेवारी २०२५ पर्यंत शहरात पाणी येईल, या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली. त्यासोबतच पाणीपट्टीतही वाढ होण्याची शक्यता असल्याचे संकेत त्यांनी दिले. शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सूचनेनंतर पाणीपट्टीत ५० टक्के सूट देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला होता. त्यावेळी ४ हजार ५० रुपये पाणीपट्टी होती. सध्या २ हजार २५ रुपये पाणीपट्टी आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेत ही सूट रद्द होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच शहरातील सर्व नळांना मीटर लावले जाणार असल्यामुळे नवे दरही लागू होतील, असे सूत्रांनी सांगितले.
वॉटर बॉयलॉजचे दर
समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेने वॉटर बॉयलॉज तयार करून राज्य शासनाची मंजुरी घेतली होती. त्यानुसार नव्या पाणीपुरवठा योजनेतील पाण्यासाठी प्रतिलीटर पाण्याचे दर लागू केले जातील. सध्या फक्त निवासी, व्यावसायिक या प्रकारात व अर्धा, पाऊण, एक ते पाच इंचांपर्यंत महापालिका नळ कनेक्शन देते. त्यासाठीचे दर ठरलेले आहेत. पण यापुढे प्रतिलीटर पाण्याचे दर लागू होतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.