करमाड : लाडगाव टोलनाक्याजवळून रेल्वे रूळ ओलांडून पायी जाण्यासाठी वापरत असलेल्या रस्त्याने दुचाकी नेण्याचे धाडस करण्याचा प्रयत्न जीवघेणा ठरला. रुळावर दुचाकी पडून पाय अडकल्याने जालन्याच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेखाली चिरडून गणेश प्रभू कापसे (३५ रा. भायगव्हाण, ता. घनसावंगी, जि. जालना हा.मु. लाडगाव ता. संभाजीनगर) हे या अपघातात मृत झाले. सदर घटना सोमवारी रात्री ७:३० वाजेच्या सुमारास घडली.
शेंद्रा एमआयडीसीत पती व पत्नी दोघे खासगी कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. गणेश कापसे हे दुपारी घरी आल्यानंतर सायंकाळी पत्नीला कंपनीतून घरी आणायला जात असताना छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर लाडगाव टोलनाक्याजवळून एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी त्यांनी चुकीचा मार्ग निवडला. धाडस करून रेल्वे रुळावरून दुचाकी चढवली. मात्र, रिमझिम पाऊस व अंधार असल्याने त्या ठिकाणी त्यांची दुचाकी रेल्वे रुळावर पडली व त्यांचा पाय अडकला. दुर्दैवाने त्याच वेळेस जालन्याहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेला येणाऱ्या रेल्वेखाली येऊन गणेश कापसे यांचा मृत्यू झाला.