नव्याने मैत्री झालेल्या मित्रानेच भोसकले, किरकोळ वादातून पैठणखेड्याच्या तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 19:29 IST2025-08-30T19:28:44+5:302025-08-30T19:29:20+5:30
पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने गवतात फेकलेला चाकू हस्तगत केला.

नव्याने मैत्री झालेल्या मित्रानेच भोसकले, किरकोळ वादातून पैठणखेड्याच्या तरुणाची हत्या
छत्रपती संभाजीनगर : नव्याने मैत्री झालेल्या मित्राने किरकोळ कारणातून खानावळीमध्येच दीपक दत्ता कांबळे (२२) याला चाकू खुपसून ठार केले.
गुरुवारी रात्री १० वाजता गेवराई तांडा येथील खंडेवाडी रोडवरील खानावळीसमोर ही घटना घडली. हल्लेखोर रवींद्र सुभाष बोर्डे (३२, रा. शेंद्रा कमगर) याला चिकलठाणा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
मूळ पैठण तालुक्यातील पैठणखेड्याचा रहिवासी असलेला दीपक मजुरी करीत होता. कामानिमित्त तो सध्या गेवराई तांडा येथील शिवकृपा कॉलनीत राहत होता. दरम्यान, खंडेवाडी रोडवर असलेल्या वाणी यांच्या खानावळीमध्ये तो नेहमी जात होता. तेथेच त्याची आरोपी बोर्डेसोबत मैत्री झाली होती. मैत्री वाढल्यानंतर ते सातत्याने सोबत फिरायचे.
दरम्यान, गुरुवारी रात्री दोघे खानावळीत असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यातून बोर्डेेने छोट्या आकाराच्या चाकूने दीपकच्या छातीत वार केले. चाकूचा वार थेट हृदयात लागल्याने दीपकचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवीकिरण दरवडे, उपनिरीक्षक उत्तम नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेत बोर्डेला ताब्यात घेतले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी पूजा नागरे यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दीपकच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. घटनेनंतर श्वान पथकाच्या मदतीने गवतात फेकलेला चाकू हस्तगत केला. बोर्डेवर यापूर्वी चिकलठाणा पोलिस ठाण्यात विवाहितेचा छळ व बँकेशी संबंधित दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दीपकचा मावस भाऊ संदीप साबळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.