विवाहबाह्य संबंधातून महिलेने मुलगा गमावले; अडसर ठरत असल्याने प्रियकरानेच काढला काटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 15:11 IST2022-08-29T15:11:35+5:302022-08-29T15:11:59+5:30
दोन महिन्यांच्या उपचारानंतर मुलाचा मृत्यू

विवाहबाह्य संबंधातून महिलेने मुलगा गमावले; अडसर ठरत असल्याने प्रियकरानेच काढला काटा
औरंगाबाद : लष्करातील जवानाने प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या मुलाचा केबल वायरने मारून खून केल्याची घटना उघडकीस आली. गंभीर जखमी ११ वर्षांच्या मुलाचे खासगी रुग्णालयात तब्बल दोन महिने उपचार सुरू असताना शनिवारी निधन झाले. या प्रकरणी लष्करी जवानाच्या विरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
गणेश बबन थोरात (रा. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) असे आरोपी जवानाचे नाव आहे. मृत मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिच्या पतीवर खासगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू असताना गणेशची ओळख दवाखान्यात झाली होती. महिला व गणेश एकमेकांचे नातेवाईक निघाले. तेव्हा गणेश औरंगाबादेतील लष्करी छावणीत कार्यरत होता. महिलेच्या पतीला किडनीच्या आजारावरील उपचारासाठी आई-वडिलांनी इंदोरला नेले. तेव्हापासून महिला ११ वर्षांच्या मुलासोबत गारखेडा परिसरात राहत होती. स्वत:ही आधीच विवाहित असताना गणेशने या विवाहितेसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. आयुष्यभर सांभाळण्याचे वचन दिले. यानंतर तो दररोज महिलेच्या घरी येत होता. गणेशने दोन वर्षांपूर्वी दिवाळीच्या दिवशी फुलाची माळ महिलेच्या गळ्यात घालत कपाळ, केसात कुंकू लावले. तसेच आजपासून तू माझी पत्नी असल्याचे सांगितले. तेव्हापासून ते दोघे पती-पत्नीसारखे राहू लागले. जानेवारी २०२२ मध्ये त्याची बदली जम्मू-काश्मीरमध्ये झाली. त्यानंतरही तो फोनद्वारे संपर्कात होता. तसेच गावाकडे आल्यावर घरी येऊन राहत होता. ३० जून रोजी गणेशने महिलेच्या मुलास केबलच्या वायरने मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या मुलास खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी उपचार सुुरू असताना २७ ऑगस्ट रोजी त्याची प्राणज्योत मालवली.
नोकरी जाण्याची भीती
गणेशने नोकरी जाण्याच्या भीतीमुळे महिलेला पोलिसांकडे चुकीचा जबाब देण्यास भाग पाडले. तसेच सिंदखेडराजा येथे (पहिल्या) पत्नीसोबत वाद झाल्यामुळे रागाच्या भरात आपल्या प्रेमात अडसर ठरल्यामुळे मुलाला मारहाण केल्याचेही गणेशने सांगितले. मुलाचा जीव गेल्यामुळे शेवटी महिलेने जवानाच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली. अधिक तपास सहायक निरीक्षक शेषराव खटाणे करीत आहेत.
१ पर्यंत पोलीस कोठडी
आरोपी जवान गणेश थोरात यास पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले. १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्या. आर.व्ही. सपाटे यांनी रविवारी दिले.