गौरीसमोर साकारला जरांगेंच्या प्रवासाचा देखावा; मराठा आरक्षणासाठी पैठणच्या महिलेचे साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 14:26 IST2025-09-01T14:25:46+5:302025-09-01T14:26:54+5:30
कागद–कपड्यांतून उभारला मराठा आंदोलनाचा प्रवास; पैठणमध्ये स्वाती माने यांचा कलात्मक अनोखा देखावा .

गौरीसमोर साकारला जरांगेंच्या प्रवासाचा देखावा; मराठा आरक्षणासाठी पैठणच्या महिलेचे साकडे
- दादासाहेब गलांडे
पैठण ( छत्रपती संभाजीअंगार) : पैठण शहरात मंगळागौरीच्या निमित्ताने सामाजिक जाणीवेचा वेगळा संदेश देणारा अनोखा देखावा साकारला गेला आहे. शहरातील यशवंत नगर येथील स्वाती राम माने या महिलेने मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज पाटील जरांगे यांच्या अंतरवली ते मुंबई प्रवास आंदोलनाचा कलात्मक देखावा आपल्या घरी उभारला आहे. हा देखावा बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे .
यशवंत नगर येथील स्वाती माने यांनी गौरी महालक्ष्मीच्या आगमनानिमित्त त्यांच्यासमोर तीन बाय पाच या जागेत कलाशिक्षक गणेश गोजरे यांचे मार्गदर्शन घेऊन आपल्या घरी देखाव्यात अंतरवली येथून सुरू झालेल्या आंदोलनातील टप्प्याटप्प्याच्या घटना क्रम चित्ररूपात उभारला आहे. जेसीबीमधून फुलांची उधळण, वाटेत ठिकठिकाणी झालेले स्वागत, मुंबईकडे निघालेल्या आंदोलनाचा प्रवास, जनतेचा उत्स्फूर्त सहभाग यांचे दर्शन या देखाव्यात घडते. केवळ कागद व कपड्यांच्या माध्यमातून हा देखावा तयार करण्यात आला असून त्यातील सर्जनशीलता पाहून नागरिक थक्क झाले आहेत.
गौरीला साकडे
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या मुंबई येथील आंदोलनात महालक्ष्मीमुळे जाता आले नाही. पण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात कुठेतरी आपलं योगदान द्यावं म्हणून ही मला संकल्पना सुचली. जरांगे यांचा थक्क करणारा प्रवास मी चित्राच्या माध्यमातून साकारला. गौरीला मी साकडे घातले आहे की सरकारला सुबुद्धी येऊ दे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू दे.
- स्वाती माने