खोट्या सह्याद्वारे विश्वासू नाेकराचा कावा, बनावट कागदपत्रे तयार करून मालकाच्या शेतीवर दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 20:01 IST2025-07-16T20:00:40+5:302025-07-16T20:01:17+5:30
फॉरेन्सिक विभागाकडून सह्या खोट्या निष्पन्न, सिटी चौक पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा

खोट्या सह्याद्वारे विश्वासू नाेकराचा कावा, बनावट कागदपत्रे तयार करून मालकाच्या शेतीवर दावा
छत्रपती संभाजीनगर : मोठ्या विश्वासाने नोकराला घर बांधण्यासाठी शेतातीलच काही जमीन विकलेल्या उद्योजकाचा त्याच नोकराने घात करून संपूर्ण शेतीच बळकावण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने बनावट ताबा इसार करारनामा करून न्यायालयात जमिनीवर दावा ठोकण्यापर्यंत मजल मारली, हे विशेष. सिटी चौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी शंकर राजू गोमलाडू, गोपाल राजू गोमलाडू व गोरख बंडूसिंग राजपूत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
उद्योजक सुगनचंद संचेती (७१, रा. अहिंसानगर) यांची वाळुज व चिकलठाण्यात कंपन्या आहेत. २०२१ मध्ये संचेती कुटुंबाने योगेश जव्हेरी यांच्याकडून करोडी शिवारात २१ एकर २४ गुंठे जमीन त्यांच्यासह नातेवाईक रंजना लोढा यांच्या नावे खरेदी केली. तेथे शंकर गोमलाडूचे वडील राजू शेतमजूर होते. गोमलाडूने घर बांधण्याची गरज असल्याचे सांगून संचेती यांना शेतातच ४३०.२० चौरस मीटर जमीन देण्याची विनंती केली. संचेती यांनी २५ लाखांत त्यांना जमीन देण्याचे आश्वासन दिले. गोमलाडूने त्यांना २५ लाखांचा धनादेश दिला. मात्र, कोरोना साथीमुळे रजिस्ट्री पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर गोमलाडूने विविध कारणे पुढे करत रजिस्ट्री टाळली. २०२३ मध्ये शंकरने संचेती यांना पैसे कमी असल्याचे सांगून रजिस्ट्रीमध्ये १० लाख रुपयांची नोंद करण्याची विनंती केली. त्याच्यावर विश्वास असल्याने संचेती यांनी मे २०२३ मध्ये ४३०.२९ चौ.मी. जागेचे खरेदीखत करून दिले.
अचानक न्यायालयाचे समन्स
२०२५ मध्ये मात्र संचेती यांना अचानक न्यायालयाचे समन्स आले. शंकर, गोपाल व गोरखने न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला. त्यात एकूण मिळकतीपैकी १ एकर क्षेत्र संचेती यांनी गोमलाडूला विक्री करण्याचा ताबा इसार करारनामा केल्याचा दावा आरोपींनी केला. चेलीपुऱ्यातील वकिलाकडून खोटा इसार करारनामा करून त्याने हा दावा केला.
स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत
संचेती यांनी करारनाम्याची सत्यता पडताळली असता, त्यांच्या बनावट सह्या करून आरोपींनी हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. १६ एप्रिल, २०२१ रोजी करारनामा केल्याचा दावा करून आरोपींनी रंजना जितेंद्र लोढा यांच्याही स्वाक्षरी त्यावर दाखवल्या. प्रत्यक्षात लोढा त्या दरम्यान शहरात नव्हत्या. पुण्याच्या इंटरनॅशनल फॉरेन्सिक सायन्स विभागाने देखील स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत असल्याचा अहवाल दिला.