छत्रपती संभाजीनगरात पुन्हा धावत्या कारने घेतला पेट; चार दिवसांत दुसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 11:46 IST2025-03-28T11:45:26+5:302025-03-28T11:46:02+5:30
बॅटरीत स्पार्क होऊन किंवा ओव्हरहीटिंगमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरात पुन्हा धावत्या कारने घेतला पेट; चार दिवसांत दुसरी घटना
छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवर धावत्या कारने अचानक पेट घेतला. गुरुवारी रात्री ९ वाजता सिंचन भवनच्या विरोधी दिशेने ही घटना घडली. दरम्यान, चार दिवसांत धावती कार पेटल्याची जालना रस्त्यावर दुसरी घटना घडली आहे. सोमवारी रात्री ९ वाजता रामनगर परिसरात धावत्या कारने पेट घेतला होता.
एन-३ मध्ये राहणारे रोहित गंगवाल हे गुरुवारी बाबा चौकातून एन-३ च्या दिशेने त्यांच्या स्कोडा लॉरा कारने जात होते. मोंढा नाका उड्डाणपूल ओलांडताच त्यांच्या कारच्या बोनटमधून धूर निघण्यास सुरुवात झाली. त्यांनी सिंचन भवनच्या विरोधी दिशेने रस्त्याच्या बाजूला कार थांबविली. तोपर्यंत कारला आगीने वेढले होते.
घटनेची माहिती कळताच अग्निशमन विभागाचे दीपराज गंगावणे, सूरज राठोड, दीपक गाडेकर, विजय कोथमिरे, अप्पासाहेब गायकवाड, किशोर कोळी यांनी धाव घेतली. जवळपास १५ मिनिटांमध्ये आग नियंत्रणात आली. मात्र, तोपर्यंत कारचा समोरील संपूर्ण भाग जळून खाक झाला होता. बॅटरीत स्पार्क होऊन किंवा ओव्हरहीटिंगमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज गंगावणे यांनी व्यक्त केला.