एका रिक्षाचालकाचे दोन ते तीन नियम भंग; ‘आरटीओ’चा ७९ जणांवर कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:35 IST2025-06-17T13:29:27+5:302025-06-17T13:35:02+5:30

शहरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे. त्याबरोबरच रिक्षाचालकांमधील गुन्हेगारांचे वाढते प्रमाणही चिंतेचा विषय झाला आहे.

A rickshaw driver violated two to three rules; RTO threatens action against 79 people | एका रिक्षाचालकाचे दोन ते तीन नियम भंग; ‘आरटीओ’चा ७९ जणांवर कारवाईचा बडगा

एका रिक्षाचालकाचे दोन ते तीन नियम भंग; ‘आरटीओ’चा ७९ जणांवर कारवाईचा बडगा

छत्रपती संभाजीनगर : नियमांचे उल्लंघन करीत धावणाऱ्या ७९ रिक्षाचालकांवर आरटीओ कार्यालयाने गेल्या चार दिवसांत कारवाईचा बडगा उगारला. या रिक्षाचालकांकडून २ लाख ७० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शहरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे. त्याबरोबरच रिक्षाचालकांमधील गुन्हेगारांचे वाढते प्रमाणही चिंतेचा विषय झाला आहे. हत्येपर्यंतचे प्रकार घडत आहेत. शहरातील रिक्षांच्या वाढलेल्या मुजोरीसंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर वाहतूक पोलिसांबरोबर आरटीओ कार्यालयही रस्त्यावर उतरले. आरटीओ कार्यालयाने १२ जूनपासून सुरू केलेल्या तपासणी मोहिमेत आतापर्यंत ७९ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

एका रिक्षाचालकाचे दोन ते तीन नियम भंग
तपासणीदरम्यान काही रिक्षाचालक दोन ते तीन नियमांचा भंग करून रस्त्यावर प्रवासी वाहतूक करीत होते. त्यामुळे अशा रिक्षाचालकांवर किमान तीन ते चार प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सर्वाधिक प्रकरणे ‘एक्सपायर्ड डॉक्युमेंट्स’ची
तपासणीत एकूण ४८ रिक्षाचालकांकडे कालबाह्य कागदपत्रे आढळली. तर, २५ रिक्षाचालकांकडे वैध परवाना आणि बॅज नव्हता. २१ रिक्षाचालक हे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करताना आढळले. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेस थेट धोका निर्माण होतो.

कोणकोणत्या नियमांचे उल्लंघन?
नियमभंगाचा प्रकार - प्रकरणे

मुदतबाह्य कागदपत्रे - ४८
क्षमतेपेक्षा प्रवासी - २१
परवाना नसलेले - ४
लायसन्स, बॅज नसलेले - २५
गणवेश नसलेले -१९
अनधिकृत पार्किंग - ६

कारवाई सुरूच राहील
रिक्षाचालकांची तपासणी मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. १२ जूनपासून सुरू केलेल्या कारवाईत नियमांचे उल्लंघन करून धावणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करून २.७० लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: A rickshaw driver violated two to three rules; RTO threatens action against 79 people