अयोध्येतील शरयू घाटासह श्रीराम मंदिराची प्रतिकृती वर्षभरात छत्रपती संभाजीनगरात साकारणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:14 IST2026-03-24T12:14:06+5:302026-03-24T12:14:27+5:30
अयोध्येचेच आर्किटेक्ट अन् तोच मूर्तिकार!; छत्रपती संभाजीनगरमध्ये उभं राहतंय भव्य राम मंदिर, वर्षभरात स्वप्नपूर्ती!

अयोध्येतील शरयू घाटासह श्रीराम मंदिराची प्रतिकृती वर्षभरात छत्रपती संभाजीनगरात साकारणार
छत्रपती संभाजीनगर : अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती बीड बायपासवरील मुर्तुजापूर परिसरात उभारण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, अयोध्येतील मंदिराचे आर्किटेक्ट आशिष सोमपुरा यांच्यावरच येथील मंदिराची रचना करण्याची जबाबदारी दिली आहे. रामलल्लाची मूर्ती घडविणारा मूर्तिकार तशीच हुबेहूब मूर्ती बनविणार आहे. त्याच कारागीरांच्या हातून हे मंदिर उभे राहणार असून, त्यासाठी कारागिरांचा ताफाही येथे येणार आहे.
बीडबायपास येथील श्रीरामचंद्र इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या ७ एकर परिसरात रामनवमीच्या मुहूर्तावर (दि.२६ ) शिलान्यास सोहळा आयोजित केला आहे.
१ एकरावर उभारणार मंदिर
७ एकर जागेपैकी १ एकरावर मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. अयोध्येतील मंदिराची नागर शैलीत मंदिराची छोटी प्रतिकृतीच हे मंदिर असेल. भाविकांना येथे आल्यावर अयोध्येतील श्रीराम मंदिरासमोर उभे राहिल्याचा भास होईल. यासाठी राजस्थानमधील मकराना मार्बलचा वापर मंदिर बांधण्यासाठी करण्यात येणार आहे.
शरयू घाटाचे आकर्षण
अयोध्येत शरयू नदीवर घाट बांधण्यात आला आहे. त्याच धर्तीवर येथे कृत्रिम शरयू घाट तयार करण्यात येणार आहे. जणू काही आपण अयोध्येत आल्यासारखे भाविकांना भास होईल, हेच या मंदिराचे वैशिष्ट्य असेल.
१ वर्षात उभारणार मंदिर
रामनवमीच्या दिवशी गुरुवारी सकाळी ९:३० वाजता मंदिराचा शिलान्यास करण्यात येणार आहे. यासाठी अयोध्येतील कारागिरांनी बनविलेली विशेष शिळा शहरात आणली आहे. शिलान्यास झाल्यानंतर पुढील वर्षभरात मंदिर पूर्णपणे उभारण्याचा आमचे उद्दिष्ट आहे.
-डाॅ.अनंत पंढरे, वैद्यकीय संचालक, श्रीरामचंद्र इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस.