शेअर मार्केटच्या नावाखाली २३ लाखांना नातेवाइकालाच गंडविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:45 IST2025-01-27T17:40:26+5:302025-01-27T17:45:01+5:30
वैजापुरातील प्रकार; तीनजणांविरुद्ध गुन्हा दाखल

शेअर मार्केटच्या नावाखाली २३ लाखांना नातेवाइकालाच गंडविले
वैजापूर : शेअर मार्केटच्या माध्यमातून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील अर्थप्लस इनव्हेस्टमेंट नावाच्या एजन्सीने वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील पणन महासंघाच्या सेवानिवृत्त ग्रेडरला २२ लाख ७३ हजार ५०० रुपयांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध शुक्रवारी रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जांबरगाव येथील सेवानिवृत्त ग्रेडर सुनील पाटील यांचा पुतण्या आरोपी विनोद उत्तम पाटील हा सध्या पुणे येथे राहतो. तो शेअर मार्केटचे काम करतो. दुसरा आरोपी सुनील गंगाधर पाटील हा बीएएमएस डॉक्टर असून, विनोद पाटील याचा मेहुणा तर तिसरा आरोपी नवनीत पाटील हा आरोपी विनोद पाटील याचा मावसभाऊ आहे. या तिघांनी पुण्यातील वाकड भागात अर्थप्लस इनव्हेस्टमेंट नावाची एजन्सी सुरू केली. तक्रारदार सुनील पाटील यांच्या पुण्यात राहणाऱ्या मुलीने २०२१ मध्ये या तिघांच्या कंपनीत काही रक्कम गुंतविली व तिला चांगला परतावा मिळाला. पाटील यांची पत्नी वंदना या एकदा मुलीस भेटण्यासाठी पुण्यात गेल्या असता मुलीने आईला शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत सांगितले व विनोद पाटील, सुनील पाटील व नवनीत पाटील यांच्या ऑफिसला भेट दिली. त्यावेळी आरोपींनी दोघींना शेअर मार्केटमध्ये कसे काम चालते, याबाबत सांगितले. त्यानंतर वंदना यांनी घरी जांबरगाव येथे आल्यानंतर पती सुनील पाटील यांना याबाबत माहिती दिली. सुनील पाटील यांना निवृत्तीनंतर ५० लाख रुपयांची रक्कम मिळाली होती. ही रक्कम गुंतविण्यासाठी त्यांनी पुतण्या विनोद पाटील याच्या आई-वडिलांना फोनवर विचारून माहिती घेतली. त्यामुळे सुनील पाटील यांनी आरोपींना विचारले असता आम्ही, तुम्हाला गुंतविलेल्या रकमेच्या चार टक्के मुद्दल व चार टक्के व्याज दरमहा परतफेड देऊ, असे आमिष दाखविले.
१७ लाख दिले अन् नंतर मारली थाप
या आमिषाला भुलून तक्रारदार सुनील पाटील यांनी ८ ऑगस्ट ते ७ फेब्रुवारी २३ या कालावधीत एकूण ४० लाख रुपये आरोपींनी दिलेल्या बॅंक खात्यात भरले. त्यातील १७ लाख २६ हजार रुपये परत मिळाले; परंतु उरलेल्या रकमेबाबत विचारणा केली असता ज्या ठिकाणी पैसे गुंतविले ती व्यक्ती खूप मोठ्या रकमेचा अपहार करून पळून गेल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुनील पाटील यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यावरून विनोद उत्तमराव पाटील, सुनील गंगाधर पाटील व नवनीत हिरालाल पाटील या तिघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.