कारागृहात झालेल्या मैत्रीतून दरोडेखोर बनला ड्रग्ज तस्कर; जळगावपर्यंत तयार केले नेटवर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 17:30 IST2024-08-09T17:30:16+5:302024-08-09T17:30:38+5:30
२९ महिने कारागृहात मुक्काम असताना इतर गुन्हेगारांसोबत वाढली मैत्री

कारागृहात झालेल्या मैत्रीतून दरोडेखोर बनला ड्रग्ज तस्कर; जळगावपर्यंत तयार केले नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : डिलक्स बेकरी दरोड्याच्या गुन्ह्यात २९ महिने कारागृहात राहिलेला गुन्हेगार बाहेर येताच अमली पदार्थांचा तस्कर बनला. कारागृहात झालेल्या मैत्रीतून त्याने थेट जळगावपर्यंत नेटवर्क तयार करून तेथील गांजा व्यापाऱ्यासोबत भागीदारी केल्याचे समोर आले आहे. राजन नागराज काळे असे त्याचे नाव आहे.
क्रांती चौकातील बदामाच्या झाडाजवळ नियमित गांजा विक्रीसाठी एजंट येत असल्याची माहिती एनडीपीएस पथकाच्या प्रमुख गीता बागवडे यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी मंगळवारी सायंकाळी सापळा रचला. राजन नेहमीप्रमाणे गांजाच्या पुड्या विक्रीसाठी येताच पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून १ किलो २०५ ग्रॅम गांजाच्या पुड्या जप्त केल्या. नूतन कॉलनीतील जावेद खान अय्युब खान याच्या मदतीने गांजा विक्री करत असल्याची कबुली त्याने दिली.
बेकरीवर टाकला होता दरोडा
राजन रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शहरातील डिलक्स बेकरी दरोड्यात तो आरोपी होता. तेथे २९ महिने कारागृहात होता. तेव्हा त्याची अमली पदार्थ विक्रेत्यासोबत मैत्री झाली. त्यानंतर तो घरफोडी, दरोड्यासारखे गुन्हे सोडून अमली पदार्थांच्या विक्रीकडे वळला. जळगावच्या चोपडा तालुक्यातील सुरेश मेहता या व्यापाऱ्याकडून तो नियमित बसने गांजा आणून शहरात विक्री करतो. अंमलदार महेश उगले यांच्या फिर्यादीवरून या गुन्ह्यात राजनसह जावेद आणि मेहतालाही आरोपी करण्यात आले आहे.
............