दिसला खड्डा टाकला मुरूम; दरवर्षी पावसाळ्यात केली जाते चार कोटींची ‘माती’!
By मुजीब देवणीकर | Updated: July 30, 2022 15:16 IST2022-07-30T15:14:11+5:302022-07-30T15:16:54+5:30
महापालिकेचा अजब कारभार, आज टाकलेला मुरूम- माती दोन दिवसांत वाहून जाते

दिसला खड्डा टाकला मुरूम; दरवर्षी पावसाळ्यात केली जाते चार कोटींची ‘माती’!
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : शहरात दरवर्षी पावसाळा आल्यावर खड्ड्यांचे प्रमाण बरेच वाढते. नागरिकांना हे खड्डे असाह्य ठरतात. खड्ड्यांच्या मुद्द्यावर ओरड सुरू होती. ही ओरड बंद व्हावी म्हणून मनपाकडून जालीम उपाय शोधून काढण्यात आला आहे. खड्ड्यात निव्वळ माती, मुरुम टाकण्यात येते. धक्कादायक बाब म्हणजे मातीद्वारे खड्डे बुजविण्याचा खर्च दरवर्षी जवळपास चार कोटींपर्यंत जातो. महापालिकेकडून खड्ड्यांमध्ये टाकलेली माती अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये वाहून जाते. मग ४ कोटींची ‘माती’ का केली जाते, असा प्रश्न उपस्थित होतोय.
शहरात मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते तयार करण्यात आले. डांबरी रस्त्यांची संख्याही बरीच आहे. डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी मनपाकडे ठोस उपाययोजना नाही. दरवर्षी पावसाळा आल्यानंतर लहान खड्डे मोठे होत जातात. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पावसाचे पाणी खड्ड्यात थांबल्यावर वाहनधारकांना अंदाज येत नाही. त्यामुळे लहान मोठे अपघात होतात. नागरिकांकडून ओरड सुरू होताच मनपाच्या वॉर्ड कार्यालयाकडून मोजक्याच खड्ड्यांमध्ये मुरूम-माती आणून टाकली जाते. याला मनपा अधिकारी ‘डब्ल्युबीएम’ म्हणतात, एखादा पक्का रस्ता तयार करण्यापूर्वी टाकण्यात येणारी ही माती असते. ही माती दोन ते तीन दिवसच टिकते. मोठा पाऊस आल्यावर माती आपोआप वाहून जाते.
गणेशोत्सवापूर्वी मोहीम
दरवर्षी मनपाकडून गणेशोत्सवापूर्वीच खड्डे बुजविले जातात. त्यासाठीही मातीचाच वापर केला जातो. गणेश भक्तांकडून ओरड होऊ नये म्हणून खड्ड्यांना मातीचा मुलामा दिल्या जातो. विसर्जन मिरवणूक संपताच मनपाने टाकलेल्या मातीचेही विसर्जन होते.
वॉर्ड कार्यालयांना अधिकार
शहरात महापालिकेचे नऊ वॉर्ड कार्यालय आहेत. खड्डे बुजविण्यासाठी वॉर्ड कार्यालयांना प्रत्येकी ५० लाख रुपये खर्चाचे अधिकार देण्यात आले आहेत. या कामासाठी अंदाजपत्रक तयार होतात. निविदा राबविली जाते. कधी थेट कामे दिली जातात. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी हा निधीही जवळपास संपविण्यात येतो. जवळपास चार कोटी रुपयांची माती वॉर्ड कार्यालयाकडून होते.
पावसाळ्यात खड्डे बुजविणे अवघड
पावसाळ्यात डांबरी पद्धतीने खड्डे बुजविणे अशक्यप्राय ठरते. वाहनधारकांना तात्पुरता दिलासा म्हणून काही ठिकाणी ‘डब्ल्युबीएम’चा वापर होतो. हे अधिक काळ टिकत नाही. रेडिमिक्स सिमेंटद्वारेही खड्डे बुजविण्याचा प्रयोग करून बघितला. त्यात यश आले नाही. हॉटमिक्सद्वारेही खड्डे बुजविण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. लवकरच स्मार्ट सिटी, मनपातर्फे जवळपास ५२७ कोटींचे सिमेंट रस्ते होणार आहेत.
शहर खड्डेमुक्त होईल
स्मार्ट सिटीमार्फत ३१७ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे मनपाच्या तिजोरीतूनही जवळपास २०० कोटींच्या रस्त्यांचे नियोजन असल्याने आगामी वर्षभरात शहर खड्डेमुक्त होईल, असा दावा मनपाकडून करण्यात येतोय. तेव्हापर्यंत खड्ड्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागेल, असे मनपाचे अप्रत्यक्ष म्हणणे आहे.
मागील वर्षीचा खर्च
वॉर्ड- खर्च (लाखांत)
०१- २८
०२- २९
०३- ३४
०४- ५२
०५- ३२
०६-४८
०७-४४
०८-४६
०९-४८