कुटुंबावर दुःखाचा डोंगर! हृदयविकाराने मुलगा वारला, धक्क्याने ६ तासांत वृद्ध आईचाही अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 17:56 IST2025-12-12T17:56:21+5:302025-12-12T17:56:53+5:30
वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील घटना

कुटुंबावर दुःखाचा डोंगर! हृदयविकाराने मुलगा वारला, धक्क्याने ६ तासांत वृद्ध आईचाही अंत
वैजापूर : मुलाचे पहाटे पाच वाजेदरम्यान हृदयविकाराने निधन झाल्यानंतर सहा तासांत शोक अनावर झालेल्या वृद्ध आईनेही आपला जीवनप्रवास थांबविल्याची हृदयद्रावक घटना वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथे बुधवारी घडली. भाऊसाहेब कचरू गंडे (वय ६५) व लक्ष्मीबाई कचरू गंडे (९०) असे या मायलेकाचे नाव आहे.
करंजगाव येथील गंडे वस्तीवर राहणारे शेतकरी भाऊसाहेब गंडे हे आपली आई, पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह राहत होते. भाऊसाहेब हे गेल्या पाच वर्षांपासून अर्धांगवायू आजाराने ग्रस्त होते. कुटुंबीय त्यांची काळजी घेत होते. दरम्यान, बुधवारी पहाटे पाचच्या दरम्यान अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने भाऊसाहेब यांचा मृत्यू झाला. यामुळे कुटुंबीय शोकसागरात बुडाले.
मुलाच्या मृत्यूचा मोठा धक्का भाऊसाहेब यांच्या ९० वर्षीय आई लक्ष्मीबाई यांना बसला. त्यानंतर दुपारी पावणेबारा वाजता त्यांनीही आपला देह ठेवला. कुटुंबातील दोघांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यामुळे गंडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मायलेकाच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. लक्ष्मीबाई यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.