चिमुकलीला कार्टून चॅनल लावून देऊन आईने संपवले जीवन; मृतदेहाजवळ मुलीचा हंबरडा
By राम शिनगारे | Updated: January 24, 2023 20:24 IST2023-01-24T20:23:35+5:302023-01-24T20:24:02+5:30
गारखेडा परिसरातील घटना, रडण्याच्या आवाजामुळे झाला उलगडा

चिमुकलीला कार्टून चॅनल लावून देऊन आईने संपवले जीवन; मृतदेहाजवळ मुलीचा हंबरडा
औरंगाबाद : दोन वर्षांच्या मुलीला वरच्या मजल्यावर टीव्हीवर कार्टून लावून देत आईने खालील मजल्यावरील बेडरूममध्ये गळफास घेतला. ही घटना गारखेडा परिसरातील आनंदनगरात सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेची पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.
रुपाली गजानन वाघ (२०) असे विवाहितेचे नाव आहे. रुपालीने पतीसोबत सायंकाळी जेवण केले. त्यानंतर पती कामावर निघून गेला. सासू सासरे ही दुकानात गेले. त्यानंतर रुपालीने मुलीला वरच्या मजल्यावरील टीव्हीवर कार्टून चॅनल लावून दिले. त्यानंतर खालच्या मजल्यावरील बेडरूममध्ये गळफास घेतला. काही वेळानंतर दोन वर्षांच्या मुलीला आई दिसत नसल्यामुळे ती खाली आली. बेडरूम उघडीच होती.
आईने गळफास घेतल्याचे चिमुकलीला उमजत नव्हते. तिने रडण्यास सुरुवात केली. ती खूप रडत असल्यामुळे हा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी पाहिले. तेव्हा त्यांना रुपालीने गळफास घेतल्याचे दिसले. रुपाली घर संसार सांभाळून शिक्षण घेत होती. ती रागीट आणि चिडचिड्या स्वभावाची होती. त्यामुळे किरकोळ कारणावरून तिचा आणि सासूचा वाद होत असे. या रागीट स्वभावातूनच तिने गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. अधिक तपास निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनात एन. एस. शेख करीत आहेत.