ऊर्जा, उत्साह, तयारीचा मेगा रनवे; लोकमत महामॅरेथॉनचा छत्रपती संभाजीनगरमधील मार्ग जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 20:07 IST2025-12-10T20:04:47+5:302025-12-10T20:07:57+5:30
लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या या लोकमत महामॅरेथॉनसाठी स्पर्धकांची जय्यत तयारी सुरू आहे.

ऊर्जा, उत्साह, तयारीचा मेगा रनवे; लोकमत महामॅरेथॉनचा छत्रपती संभाजीनगरमधील मार्ग जाहीर
छत्रपती संभाजीनगर : लोकमत महामॅरेथॉन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना शहरात धावण्याचा जल्लोष सुरू झाला आहे. धावपटूंना प्रोत्साहित करणारा या मॅरेथॉनचा मार्ग जाहीर झाला असून, हजारो नागरिक या मेगा इव्हेंटसाठी सज्ज झाले आहेत. १४ डिसेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुल मैदानावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ३, ५, १० आणि २१ किलोमीटरच्या स्पर्धेसाठी नियोजित मार्ग शहराच्या गतिमान छबीला अधिक उजाळा देतील.
लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या या लोकमत महामॅरेथॉनसाठी स्पर्धकांची जय्यत तयारी सुरू आहे. २०१६ मध्ये सुरू झालेली महामॅरेथॉन राज्यातील प्रमुख सहा शहरांत आयोजित केली जाते. ७० हजारांपेक्षा अधिक धावपटू यात सहभागी होत आहेत. यंदा छत्रपती संभाजीनगरमध्ये महामॅरेथॉनच्या नवव्या सिझनसाठी मंगळवारी शहर वाहतूक पोलिसांनी मार्गाचा आढावा घेतला. आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणाऱ्या या सोहळ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शिवाय, नागरिकांनी १४ डिसेंबर रोजी या स्पर्धेस सहकार्य करण्याचे आवाहन लोकमत समूह करत आहे.
फ्लॅग ऑफच्या वेळा :
-२१ कि.मी. : सकाळी ५.४५
-१० कि.मी. : सकाळी ६.००
-५ कि.मी. : सकाळी ७.२०
-३ कि.मी. : सकाळी ७.३०
पारितोषिक वितरण : सकाळी ८.३० ते ९.३०
असा असेल मार्ग:
२१ कि.मी. : २१ किलोमीटर प्रकारातील मॅरेथॉन विभागीय क्रीडा संकुलापासून सुरू होईल. पुढे सूतगिरणी चौक ते गजानन महाराज मंदिर ते सेव्हनहिल उड्डाणपूल मार्गे डावीकडे आकाशवाणी चौकाच्या दिशेने जाईल. तेथून पुढे अमरप्रीत चौक, क्रांती चौक, गोपाल टी कॉर्नर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मार्गे जय टॉवर व्हिट्स हॉटेल, हॉटेल ग्रेट पंजाबसमोरून वळण घेऊन पुन्हा हॉटेल व्हिट्सकडून देवगिरी महाविद्यालयाच्या दिशेने जाईल. देवगिरी महाविद्यालय, भाजीवालीबाई पुतळा, शहानूरमियाँ दर्गा चौक ते पुढे विभागीय क्रीडा संकुल. याच मार्गे दोन फेऱ्यांद्वारे २१ किलोमीटरची मॅरेथॉन पार पडेल.
१० कि.मी. : १० किलोमीटर प्रकारातील मॅरेथॉन विभागीय क्रीडा संकुलापासून सुरू होईल. पुढे सूतगिरणी चौक ते गजानन महाराज मंदिर ते सेव्हनहिल उड्डाणपूल मार्गे डावीकडे आकाशवाणी चौकाच्या दिशेने जाईल. तेथून पुढे अमरप्रीत चौक, क्रांती चौक, गोपाल टी कॉर्नर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मार्गे जय टॉवर व्हिट्स हॉटेलजवळ डाव्या बाजूला देवगिरी महाविद्यालयाच्या दिशेने जाईल. देवगिरी महाविद्यालय, भाजीवालीबाई पुतळा, शहानूरमिया दर्गा चौक ते पुढे विभागीय क्रीडा संकुल. याच मार्गे १० किलोमीटरसाठी एक फेरी पार पडेल.
५ कि.मी. : विभागीय क्रीडा संकुल, सूतगिरणी चौक, जवाहरनगर सिग्नल चौक, गजानन महाराज मंदिर, सेव्हनहिल उड्डाणपूल चौकातून वळण घेऊन त्याच मार्गे विभागीय क्रीडा संकुलापर्यंत पूर्ण होईल.
३ कि.मी. : विभागीय क्रीडा संकुल, सूतगिरणी चौक, जवाहरनगर सिग्नल चौक, गजानन महाराज मंदिर चौकातून वळण घेऊन त्याच मार्गे विभागीय क्रीडा संकुलापर्यंत ३ कि.मी. ची फेरी पूर्ण होईल.