दोनदा विधानसभा लढवलेला नेता अन् पोलिसांकडून दोघांचे अपहरण, बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:19 IST2025-04-08T12:15:48+5:302025-04-08T12:19:38+5:30
राजकीय पदाधिकारी, पोलिसाकडून दोघांचे अपहरण, गंभीर मारहाण, डोक्याला पिस्तूलही लावले; पोलिस पुत्राचा गुन्ह्यात सहभाग, पीडित तरुणही सेवानिवृत्त फौजदाराचा मुलगा

दोनदा विधानसभा लढवलेला नेता अन् पोलिसांकडून दोघांचे अपहरण, बेदम मारहाण
छत्रपती संभाजीनगर : दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेला राजकीय पदाधिकारी संदीप भाऊसाहेब शिरसाठ याने पोलिस भावाच्या मदतीने दोन तरुणांचे अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. १५ ते २० गुंडांसह त्यांना बेदम मारहाण करून एकाला १५ तास ओलीस ठेवून पिस्तुलाने धमकावले. रविवारी रात्री ही धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करण्याआधीच गुन्हे शाखेने संदीपला सातारा पोलिस ठाण्यातूनच अटक केली.
शरद भावसिंग राठोड (३३, रा. छत्रपतीनगर, देवळाई) हे बांधकाम कंत्राटदार आहेत. सहा वर्षांपूर्वी त्यांची अभिजीत ऊर्फ बंटी बर्डे (२८) याच्यासोबत ओळख झाली. अभिजीत शासकीय कंत्राटे मिळवण्याच्या प्रक्रियेत तरबेज आहे. त्यासाठी तो शिरसाठचे काम पाहत होता. मात्र, शिरसाठच्या छळामुळे अभिजीतने त्याचे काम बंद केले. त्यातून शिरसाठ त्याला मारहाण करून धमकावत होता. अभिजीत त्याचे काम सोडून शरदचे काम करत असल्याची कुणकुण शिरसाठला लागली. शनिवारी मध्यरात्री २ वाजता शरद बीड बायपासवरील हॉटेल साईस्वराज येथे होते. शिरसाठ, शहर पाेलिस दलात कार्यरत त्याचा भाऊ मिथुन भाऊसाहेब शिरसाठ, स्वप्निल गायकवाड, हर्षल यांनी त्यांना फॉर्च्यनुरमध्ये बळजबरीने बसवून सुधाकरनगरच्या कार्यालयावर नेले.
अंगावर वळ उमटेपर्यंत मारहाण
सर्व आरोपींनी मिळून शरद यांना बेल्ट, वायर, रॉड, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली. कपाळावर पिस्तूल लावून बंटीला हाॅटेलवर बोलावण्याचे नाटक करण्यास सांगितले. बंटी देवळाई चौकात पोहोचताच शिरसाठच्या गुंडांनी बंटीलाही कार्यालयात नेत गंभीर मारहाण केली. शरद यांच्या घरी नेत बंटीचे सर्व साहित्य, लॅपटॉप, कपडे ताब्यात घेतले. त्यानंतर पहाटे शरद यांना देवळाई चौकात सोडले.
थेट पोलिस आयुक्तांकडे धाव
बंटीचा १० वाजेपर्यंत संपर्क न झाल्याने शरद यांनी थेट पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेत घटनाक्रम सांगितला. पवार यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांना कारवाईच्या सूचना केल्या. सहायक निरीक्षक रवी गच्चे, उपनिरीक्षक विशाल बोडखे, संदीप सोळंके, प्रवीण वाघ यांचे पथक शिरसाठच्या शोधासाठी रवाना झाले. घर, कार्यालयात तो मिळून आला नाही. तोपर्यंत शिरसाठला पोलिसांपर्यंत प्रकरण पोहोचल्याची कुणकुण लागली. त्याने रात्री ९ वाजेपर्यंत बंटीला सोबत ठेवत तक्रार न देण्यासाठी धमकावून तक्रार नसल्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्याला स्वत: सातारा ठाण्यात घेऊन जात तक्रार नसल्याचे लिहून देण्यासाठी दमदाटी केली.
पोलिसांनी डाव उधळून लावला
शिरसाठ प्रकरणाला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांना लक्षात आले. तो सातारा ठाण्यात पोहोचल्याचे कळताच गुन्हे शाखेने ठाण्यात धाव घेतली. बंटीला त्याच्यापासून वेगळे करत शिरसाठला अटक केली. न्यायालयाने त्याला ११ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. शिवाय, अपहरणासाठी वापरलेल्या शिरसाठच्या दोन गाड्याही जप्त केल्या.
सर्वांना पोलिसांची पार्श्वभूमी
शिरसाठ स्वत: पोलिस पुत्र असून त्याचा भाऊ मिथुन क्रांती चौक पोलिस ठाण्यात नियुक्त आहे. मात्र, दोन वर्षांपासून कर्तव्यावर गैरहजर आहे. हर्षलचे वडीलही पोलिस आहेत. राठोडचे वडील सेवानिवृत्त फौजदार आहेत.