आठ महिन्यांपासून गुंगारा देणारा हिस्ट्रीशिटर पकडला, जवाहरनगर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 21:36 IST2023-05-11T21:35:45+5:302023-05-11T21:36:26+5:30
आरोपीवर १७ गुन्हे दाखल.

आठ महिन्यांपासून गुंगारा देणारा हिस्ट्रीशिटर पकडला, जवाहरनगर पोलिसांची कारवाई
छत्रपती संभाजीनगर : एका महिलेच्या घरात चोरीच्या प्रकारात निष्पन्न झालेला कुख्यात गुन्हेगार शहर पोलिसांना मागील आठ महिन्यांपासून गुंगारा देत होता. तो शहरात दाखल झाल्याची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी त्यास शिताफीने अटक केली. त्याच्या विरोधात १७ गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.
शेख अली शेख सत्तार (रा. इंदिरानगर, गारखेडा) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. गारखेडा परिसरातील तस्लीम अलीम शहा यांच्या घरातुन हजारो रुपयांचा ऐवज ५ सप्टेंबर २०२२ रोजी चोरीला गेला होता. त्या गुन्ह्यात तपास करताना अंमलदार गोकुळ जाधव यांनी शेख मजहर शेख गुलाब (रा. इंदिरानगर, गारखेडा) यास अटक केली होती. त्याच्यासोबत असणारा शेख अली हा तेव्हापासून फरार होता. पोलिसांना सतत गुंगारा देऊन फरार होत होता.
७ मे रोजी फरार आरोपी शेख अली हा शिवाजीनगर भागात आल्याची गोपनीय माहिती डायल ११२ चे बिट मार्शल हवालदार चंद्रकांत पोटे, मारोती गाेरे यांना मिळाली. ही माहिती निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक वसंतर शेळके यांना देऊन आरोपीला पकडण्यासाठी पथक गेले. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शेख अली हा सापडला. आरोपी शेख अली याच्या विरोधात खूनाचा प्रयत्न, चोरी, घरफोडी असे एकुण १७ गुन्हे दाखल आहेत.
तीन दिवसांची पोलिस कोठडी
फरार झालेला आरोपी आठ महिन्यांना जवाहरनगर पोलिसांच्या हाती लागला. त्यास अटक केल्यानंतर गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजुर केली आहे. अधिक तपास अंमलदार गोकुळ जाधव करीत आहेत.