दीक्षांत सोहळ्यात उपराष्ट्रपतींना 'उपनिषद' भेटीवरून विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत जोरदार खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 11:44 IST2025-03-16T11:42:14+5:302025-03-16T11:44:07+5:30
उपराष्ट्रपतींना उपनिषद भेट दिल्यामुळे पुस्तक निवड समितीच्या अध्यक्ष डॉ. भारती गवळी यांनी दिलगीरी व्यक्त केली.

दीक्षांत सोहळ्यात उपराष्ट्रपतींना 'उपनिषद' भेटीवरून विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत जोरदार खडाजंगी
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या दीक्षांत सोहळ्यात उपराष्ट्रपतींना भेट दिलेला उपनिषद ग्रंथ, प्रकुलगुरू, परीक्षा संचालक आणि व्यवस्थापन परिषद सदस्यांना व्यासपीठावर स्थान आणि विद्यार्थ्यांना पदवी प्रदान न केल्यामुळे अधिसभेच्या बैठकीत जोरदार राडा झाला. उपराष्ट्रपतींना उपनिषद भेट दिल्यामुळे पुस्तक निवड समितीच्या अध्यक्ष डॉ. भारती गवळी यांनी दिलगीरी व्यक्त केली.
विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभा बैठकीत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य प्रा. हरिदास सोमवंशी यांनी दीक्षांत सोहळ्यास झालेल्या खर्चाच्या तपशीलाची मागणी केली. त्यावर प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. प्रा. सोमवंशी यांनी उपप्रश्न मांडल्यानंतर डॉ. उमाकांत राठोड यांनी दीक्षांत सोहळ्यात उपराष्ट्रपतींना उपनिषद ग्रंथ भेट दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. उपनिषदांमध्ये वर्णव्यवस्था असून, शुद्र, अतिशुद्रांसह महिलांविषयी अतिशय गलिच्छ लिहिलेले आहे. मनुस्मृतीचा पुरस्कार केलेला आहे. त्या मनुस्मृतीचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले. तरी त्यांच्या नावाच्या विद्यापीठाचे प्रशासन त्या विचारसरणीचा पुरस्कार करणारे ग्रंथ पाहुण्यांना भेट देते. ही गंभीर बाब असून, आंबेडकरी चळवळीचा अपमान असल्याचे सांगितले. त्यावर कुलगुरू म्हणाले, पाहुण्यांना ग्रंथ देण्यासाठी एक समिती स्थापन केलेली होती. समितीमध्ये परीक्षा संचालक डॉ. गवळी, डॉ. दासू वैद्य आणि डॉ. मुस्तजिब खान यांचा समावेश होता. समितीने सुचविलेली बाब मान्य केल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. तेव्हा प्रा. सुनील मगरे यांनी व्यासपीठावर प्रकुलगुरू व परीक्षा संचालकांना बसू दिले नाही. ते दलित असल्यामुळे हा प्रकार त्यांच्यासोबत केल्याचा आरोप केला. तसेच हा प्रोटोकॉल कुठून आला होता, असा जाबही विचारला. त्यावर कुलगुरूंनी विद्यापीठ प्रशासनाने पाठविलेली यादीच सभागृहासमोर वाचून दाखवली. तसेच उपराष्ट्रपती कार्यालयाने पाठविलेल्या प्रोटोकॉलची माहितीही दिली. या सर्व प्रकारावर डॉ. भारत खैरनार यांनी निषेधाचा ठराव घेण्याची मागणी केली. तसेच डॉ.संजय कांबळे, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. हरिदास सोमवंशी यांनीही बाजू मांडली. शेवटी सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन परीक्षा संचालक डॉ.भावना गवळी यांनी दिलगीरी व्यक्त केली.
काही सदस्यांकडून समर्थन
उपनिषद ग्रंथ भेट दिल्यावरून चर्चा सुरू असतानाच डॉ. योगिता होके पाटील यांनी उपनिषदांची व्याख्या समजून घेतल्यानंतर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी केली. तेव्हा डॉ. राठोड, प्रा. मगरे, प्रा. सोमवंशी यांच्यासह इतरांनी त्यांच्या विरोधात आक्रमक भुमिका घेतली. त्याशिवाय सदस्य छत्रभुज गोडबोले यांनीही यावर बाजू मांडली.
यापुढे सगळ्यांची व्यवस्था होईल
दीक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांना पदव्या, अधिकारी व सदस्यांना व्यासपीठावर संधी मिळाली नाही. यावर बोलताना कुलगुरू डॉ. फुलारी यांनी झाले ते झाले आता यापुढे सगळ्यांची व्यवस्था होईल, असेच पाहुणे बोलावण्यात येतील. त्याविषयीची चर्चा व्यवस्थापन परिषदेत करण्यात येईल, असे स्पष्ट करीत वादावर पडदा टाकला.