फेसबुकवरील विदेशी मैत्रिणीने गिफ्ट पाठविले; कस्टम चार्जेसच्या नावाखाली १६ लाख ६९ हजार गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 19:31 IST2025-02-18T19:31:00+5:302025-02-18T19:31:41+5:30

१६ लाख ६९ हजार ७२७ रुपये पाठवूनही पार्सल आणि मौल्यवान वस्तू काही मिळाल्या नसल्याने पोलिसात धाव

A foreign friend on Facebook sent a gift; 16 lakh 69 thousand was lost under the name of custom charges | फेसबुकवरील विदेशी मैत्रिणीने गिफ्ट पाठविले; कस्टम चार्जेसच्या नावाखाली १६ लाख ६९ हजार गेले

फेसबुकवरील विदेशी मैत्रिणीने गिफ्ट पाठविले; कस्टम चार्जेसच्या नावाखाली १६ लाख ६९ हजार गेले

छत्रपती संभाजीनगर : सरकारी नोकरीत असलेल्या एकास फेसबुकवरील महिलेची मैत्री तब्बल १६ लाख ६९ हजार ७२७ रुपयांमध्ये पडली. फेसबुकच्या मॅसेंजरवर चॅटिंग केल्यानंतर संबंधित महिलेने मौल्यवान वस्तू व विदेशी चलन पाठवत असल्याचे सांगितले. त्यानुसार पाठविलेल्या पत्त्यावर गिफ्ट पाठवून कस्टम चार्जेसच्या नावाखाली १६ लाख ६९ हजार ७२७ रुपयांना फसविले आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादी मिलिंद आश्रू म्हस्के (वय ५४, रा. शिवाजीनगर, गारखेडा परिसर) यांच्या तक्रारीनुसार १७ सप्टेंबर २०१९ रोजी कॅलरा अमोंग नावाच्या महिलेने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. दोघांमध्ये चॅटिंगमधून मैत्री घट्ट झाल्यानंतर व्हाॅट्सॲप क्रमांक शेअर केले. त्यावर दररोज बोलणे होत असे. त्यानंतर महिलेने ऑनलाइन गिफ्ट पाठवते म्हणून पूर्ण पत्ता व माहिती मागवली. त्यानंतर काही दिवसांनी दोन मोबाइलवरून फोन आले. त्यांनी आम्ही कस्टममधील अधिकारी बोलत असून, तुमचे पार्सल कस्टममध्ये अडकले आहे. तुम्हाला कस्टम ड्युटी भरून ते सोडवावे लागतील, अन्यथा तुमचे पार्सल रद्द होऊ शकते, असे सांगितले. तसेच विश्वास बसण्यासाठी एका मोबाइलवरून आयकार्डही पाठविण्यात आले. त्यानंतर ईमेलवरूनही संपर्क साधण्यात आला. या सर्व प्रकारानंतर कस्टम ड्युटी आणि पार्सल चार्जेसच्या नावाखाली एका बँक खात्यातून ३ लाख ८६ हजार १५१ रुपये पाठविले. त्यानंतर दुसऱ्या बँक खात्यातून १२ लाख ८३ हजार ५७६ रुपये पाठविले. एकुण दोन्ही खात्यातील मिळून १६ लाख ६९ हजार ७२७ रुपये पाठविले. यानंतरही संबंधित पार्सल आणि मौल्यवान वस्तू काही मिळाल्या नसल्याचेही स्पष्ट झाल्यानंतर पोलिसात धाव घेतली.

पाच वर्षांपूर्वीची घटना
फेसबुकवरील मैत्रीतून फसविण्यात आल्याची घटना १७ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत घडली आहे. फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे १७ जानेवारी २०२० रोजी लक्षात आले. मात्र, त्यानंतर पाच वर्षांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात १६ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: A foreign friend on Facebook sent a gift; 16 lakh 69 thousand was lost under the name of custom charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.