पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 14:48 IST2022-08-26T14:46:10+5:302022-08-26T14:48:12+5:30
नदीत उतरून बैलांना धुताना पाण्याचा अंदाज चुकल्याने शेतकरी बुडाले

पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू
पैठण/जायकवाडी (औरंगाबाद) : बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या एका २६ वर्षीय शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील नारायणगाव येथे गुरुवारी दुपारी घडली आहे.
बाळासाहेब रामनाथ गवळी (वय २६ ) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी पोळा सण असल्याने नारायणगाव येथील शेतकरी बाळासाहेब रामनाथ गवळी हे गुरुवारी खांदेमळणीच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ वाजेच्या दरम्यान कुटुंबीयांना सांगून गावाजवळील नदीमध्ये बैलजोडी धुण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी नदीच्या पाण्यात उतरून बैलांना अंघोळ घालीत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. यातच त्यांचा मृत्यू झाला.
बाळासाहेब गवळी हे बऱ्याच वेळानंतर घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी व काही ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. यावेळी बाळासाहेब गवळी याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. ग्रामस्थांनी तत्काळ नदीत उडी मारून त्यांना पाण्याबाहेर काढून पैठण येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. ऐन पोळा सणाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे नारायणगावसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.