शेतकरी दाम्पत्य शेतकामात व्यस्त, इकडे चोरट्यांनी भरदिवसा घरफोडत पळवला लाखोंचा ऐवज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 19:29 IST2023-08-26T19:28:09+5:302023-08-26T19:29:11+5:30
शेतातून काम करून घरी परतल्यानतंर दाम्पत्यास घराचा दरवाजा उघडा दिसला

शेतकरी दाम्पत्य शेतकामात व्यस्त, इकडे चोरट्यांनी भरदिवसा घरफोडत पळवला लाखोंचा ऐवज
फुलंब्री : शहरातील सावतामाळी शाळेच्या नजीक असलेल्या एका घरात भरदिवसा घरफोडीची घटना शुक्रवारी दुपारी घडली. यात चोरट्यांनी सोन्याच्या अंगठीसह २ लाख ६५ हजार रुपायचा ऐवज पळविला आहे. या प्रकरणी शुक्रवारी रात्री १० वाजता फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील सुलतानवाडी येथील सुभाष शिंदे हे फुलंब्री शहरातील सावतामाळी शाळेच्या नजीक कुटुंबांसह राहतात. शिंदे पतीपत्नी शुक्रवारी सकाळी १० वाजता घरबंदकरून शेतातील कामे करण्यासाठी सुलतानवाडी येथे गेले. दिवसभर काम करून सायंकाळी ७ वाजता घरी परतले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. आता जाऊन पाहणी केली असता कपाटातील वस्तू व कपडे खाली पडलेले दिसले. कपाटात ठेवलेले २ लाख ६० हजार रुपये व एक सोन्याची अंगठी गायब दिसली. सुभाष शिंदे यांनी फुलंब्री पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे करीत आहे.