भिक्षा मागून घरी परतणाऱ्या बालकास मिनी ट्रॅव्हल्सने उडविले; चार भांवड थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:13 IST2025-09-01T13:12:20+5:302025-09-01T13:13:05+5:30

पैठण- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील घटना

A child returning home from begging was crushed by a minibus; four siblings narrowly escaped | भिक्षा मागून घरी परतणाऱ्या बालकास मिनी ट्रॅव्हल्सने उडविले; चार भांवड थोडक्यात बचावले

भिक्षा मागून घरी परतणाऱ्या बालकास मिनी ट्रॅव्हल्सने उडविले; चार भांवड थोडक्यात बचावले

ढोरकीन/जायकवाडी : गाव परिसरात भिक्षा मागून घराकडे गप्पा मारत, हसत खेळत जाणाऱ्या पाच भावंडांपैकी एकास भरधाव मिनी ट्रॅव्हल्सने उडविले. या अपघातात १० वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला तर सोबतचे चार भावंड बचावले. ही घटना पैठण- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ढोरकीन शिवारात शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. पप्पू पंडित भोसले (रा. पारधीवस्ती, टाकळीपैठण ता. पैठण) असे मयताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास पैठण- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ढोरकीन शिवारातील एका हाॅटेल समोरून पप्पू पंडित भोसले व त्याचे सख्खे आणि चुलत बहीण भाऊ, असे एकूण ५ जण भिक्षा मागून रस्ता ओलांडून बालानगर फाट्यावरून हसत खेळत पुढे बोरगावकडे घरी पायी जात असताना छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव जाणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्सने (महा.४३ एच. ३३३७) पप्पू भोसले यास जोराची धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत असलेले चार भावंडे या अपघातातून बचावले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने पप्पू भोसले यास पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश घोडके यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. मयत पप्पू भोसले याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे.

वाहनचालक फरार; गुन्हा दाखल
अपघातानंतर मिनी ट्रॅव्हल्स वाहनचालक वाहन घेऊन पुढे छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन किलोमीटर अंतरावर वाहन उभे करुन फरार झाला. पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेऊन ठाण्यात जमा केले आहे. याबाबत मयताचे वडील पंडित भोसले यांच्या फिर्यादीवरून वाहनचालकाविरुद्ध एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A child returning home from begging was crushed by a minibus; four siblings narrowly escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.