राखी बांधण्यासाठी पुण्याहून येणाऱ्या बहिणीची वाट पाहणाऱ्या भावाचा कारच्या धडकेत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 15:16 IST2024-08-21T14:45:31+5:302024-08-21T15:16:48+5:30
बहीण चौकात वाट पाहत राहिली; राखी पौर्णिमेला राखी बांधून घेण्याचे स्वप्न राहिले अधुरे

राखी बांधण्यासाठी पुण्याहून येणाऱ्या बहिणीची वाट पाहणाऱ्या भावाचा कारच्या धडकेत मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : राखी पौर्णिमेनिमित्त पुण्यावरून येणाऱ्या बहिणीची वाट पाहणाऱ्या भावाचा सुसाट कारच्या धडकेत मृत्यू झाला. वैभव सुधाकर कुलकर्णी (वय ५५, रा. उल्कानगरी) असे मृताचे नाव आहे. सोमवारी रात्री १ वाजता बाबा चौकात हा अपघात घडला.
खासगी कंपनीत अभियंता असलेले वैभव यांची बहीण अंजली वाघदरीकर या राखी पौर्णिमेनिमित्त शहरात एसटी बसने येणार होत्या. त्यांना घरी आणण्यासाठी वैभव महावीर चौकात गेले होते. बाबा पेट्रोलपंपाजवळ कोपऱ्यात ते बहिणीची वाट पाहत उभे होते. यावेळी लोखंडी पुलाकडून कारचालक (एमएच २० एफवाय १९८५) सुसाट वेगात आला व थेट एका उभ्या कारवर धडकला. त्या कारमध्ये कोणीही नव्हते. मात्र, ती कार दोन वेळेस फिरून थेट वैभव यांच्यावर जाऊन धडकली. यात ते दूरवर फेकले जाऊन दगडावर आपटून गंभीर जखमी झाले.
बहीण चौकात वाट पाहत राहिली...
अंजली चौकात पोहोचण्याच्या काही मिनिटांपूर्वी वैभव यांचा अपघात झाला. स्थानिकांनी धाव घेत रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना घाटीत दाखल केले. अंजली सातत्याने त्यांना कॉल करत होत्या. मात्र, तोपर्यंत भावाचा मृत्यू झाला होता. वैभव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आहेत. ऐन राखी पौर्णिमेलाच बहीण भावांची ताटातूट झाल्याने हळहळ व्यक्त होत होती.