औषधाची ४० ची बाटली नशेसाठी ४०० ला; छत्रपती संभाजीनगरमध्ये MR भाऊ बनले तस्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 13:29 IST2025-09-13T13:28:03+5:302025-09-13T13:29:23+5:30
कानपूरद्वारे मालेगाव, नाशिकला व्हाया छत्रपती संभाजीनगर नशेसाठी औषधांचा पुरवठा; वाळूजच्या बड्या लॉजिस्टिक कंपनीवर एएनसी पथकाची धाड,

औषधाची ४० ची बाटली नशेसाठी ४०० ला; छत्रपती संभाजीनगरमध्ये MR भाऊ बनले तस्कर
छत्रपती संभाजीनगर : उत्तर प्रदेशच्या कानपूरहून औषधांच्या बाटल्यांची ऑर्डर देऊन छत्रपती संभाजीनगरमार्गे नाशिक, मालेगावमध्ये नशेसाठी तस्करी होत होती. या रॅकेटचा एनएनसी (अँटी नार्कोटिक्स सेल) पथकाने वाळूजमध्ये शुक्रवारी रात्री पर्दाफाश केला. मध्यरात्री साडेबारापर्यंत ही कारवाई सुरूच होती.
फार्मसीचे शिक्षण घेतलेल्या चाळीसगावच्या दोन सख्ख्या भावांनी औषध दुकान बंद पडल्यानंतर ही तस्करी सुरू केली. त्यांतील एक भाऊ वाळूजमध्ये माल घेण्यासाठी येणार असल्याचे समजताच एएनसी पथकाने वाळूजमधील बड्या लॉजिस्टिक कंपनीवर शुक्रवारी दुपारी छापा मारत चौघांना पकडले. यात दोन आरोपी भावांपैकी एकाचा समावेश आहे. कंपनीच्या गोदामात २५०४ बाटल्यांची २० खोकी सापडली; यामुळे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर अमली पदार्थांच्या तस्करांचे हब बनल्याचे अधोरेखित झाले.
शहरात गुंगीच्या औषधांचा नशेसाठी मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शुक्रवारी या कंपनीतून मोठ्या प्रमाणातील बाटल्या घेऊन जाण्यासाठी नाशिकहून तरुण येणार असल्याचे समजले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूचनेवरून एएनसी (अँटी नार्कोटिक्स सेल) पथकाच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी धाड टाकली. तेथे कानपूरहून आलेल्या २५०४ सिरपच्या बाटल्यांचे २० बॉक्स सापडले. कारवाईबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली. रात्री उशिरा पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त पंकज अतुलकर यांनी कंपनीत कारवाईचा आढावा घेतला.
एक भाऊ ताब्यात, एकासाठी पथक नाशिकला
- मूळ चाळीसगावचे रूपेश पाटील, अवी पाटील या भावांनी या औषधाची ऑर्डर दिली होती. दोघेही एमआर असून त्यांचे दोन वर्षांपूर्वी मेडिकल बंद पडले. परवानादेखील रद्द झाला.
- त्याच ओळखीवर ते उत्तर प्रदेश मधून कोडीन फॉस्फेट आणि ट्रायप्रोलिडीन एचसीएल हे गुंगीकारक औषध मागवत होते. काही माल स्थानिक विक्रेत्यांना देऊन उर्वरित नाशिक, मालेगावला पाठवत.
- एका भावाला गोडावूनमधून पकडले. दुसऱ्यासाठी विशेष पथक नाशिकला रवाना झाले.
- पाटीलसह शहरातील तीन तस्करांना पकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कंपनी ते पेडलर्स : असे आहे रेट कार्ड
- एका बाटलीची मूळ किंमत १७५ रुपये
- पाटील बंधूंना ४० रुपयांना मिळायची.
- पुढे पेडलर्सला ती १४० रुपयांना विक्री.
- पुढे नशेखोरांना ४०० ते ५०० रुपयांपर्यंत विक्री
कोडीन फॉस्फेट काय करते ?
कोडीन फॉस्फेट हे एक मॉर्फिनसदृश (ओपिऑइड) औषध आहे. हे मुख्यतः वेदना कमी करण्यासाठी, अतिप्रमाणातला खोकला नियंत्रणात आणण्यासाठी वापरले जाते. हे औषध मेंदूमधील वेदनांची जाणीव करणारे सिग्नल कमी करते. यामुळे झोप, भोवळसदृश्य नशा येते. अतिसेवनाने श्वसन प्रक्रिया मंदावते. केवळ नोंदणीकृत डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय विकत घेणे, वापरणे बेकायदेशीर आहे. याच्या अतिवापरामुळे व्यसन लागून शरीरावर गंभीर दुष्परिणाम होतात.