आई-वडील मजूरीवर, घराजवळून ५ वर्षांच्या मुलीचे अपहरण, छ. संभाजीनगरमध्ये खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:25 IST2025-11-13T12:24:53+5:302025-11-13T12:25:28+5:30
धक्कादायक! कामासाठी स्थलांतरित झालेले मध्यप्रदेशचे दाम्पत्य कामात व्यग्र असताना मुलगी बेपत्ता

आई-वडील मजूरीवर, घराजवळून ५ वर्षांच्या मुलीचे अपहरण, छ. संभाजीनगरमध्ये खळबळ!
छत्रपती संभाजीनगर : आई-वडील कामावर असताना घराजवळच खेळणारी पाच वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. मंगळवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. मात्र, बुधवारी रात्रीपर्यंत तिचा शोध न लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला जात असून, चिकलठाणा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे चार पथक तिचा शोध घेत आहेत.
मध्यप्रदेशातील सेंधवा येथील राम चव्हाण कुटुंबासह कामानिमित्त शहरात आले आहे. सध्या ते पिसादेवी-पळशी रस्त्यावरील ओंकार सिटी बांधकाम प्रकल्पावर काम करत असून तेथेच वास्तव्यास असतात. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी चव्हाण दाम्पत्य कामात व्यस्त असताना इतर कामगारांच्या मुलींसोबत त्यांची पाच वर्षांची मुलगी राशी खेळत होती. दुपारी तीनच्या सुमारास राम इमारतीखाली आल्यावर त्या मुलींसोबत राशी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी मुलींना विचारणा केली. त्यांना काही सांगता आले नाही. अन्य कामगारांच्या मदतीने राशीचा आसपास शोध घेऊनही दूरपर्यंत राशी सापडली नाही. घाबरलेल्या चव्हाण दाम्पत्याने चिकलठाणा पोलिस ठाणे गाठले. घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नागरे, चिकलठाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सर्व परिसर पिंजून काढला
पोलिसांनी राशीच्या शोधासाठी पिसादेवी, पळशी परिसर पिंजून काढला. निर्मनुष्य परिसर, झाडाझुडपांतही तिचा शोध घेतला. अग्निशमन दलाला पाचारण करून नाले, ओढे, तलावांमध्येही शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, राशी मिळून आली नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना केल्या. त्यानंतर चिकलठाणा पोलिसांची दोन, तर स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके राशीच्या शोधासाठी रवाना झाली.
सोबतच्या मुलींना काहीच सांगता येईना
निरीक्षक दरवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राशीबाबत आसपासच्या जिल्हा पोलिसांनाही माहिती कळवण्यात आली आहे. तिथे खेळत असलेल्या मुलीही लहान असल्याने त्यांनाही काहीच सांगता येत नाही. तिच्या शोधासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत असून गुरुवारी पुन्हा अधिक पोलिस कर्मचाऱ्यांसह तिचा शोध घेतला जाईल, असे दरवडे यांनी स्पष्ट केले.