९४ वे साहित्य संमेलन ऑनलाईन अशक्य; परिस्थिती सुधारल्यास छोटेखानी सोहळा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 13:09 IST2020-11-26T13:03:04+5:302020-11-26T13:09:29+5:30

अखिल भारतीय मराठी साहित्य  महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांची माहिती 

94th Literary Conference Online Impossible; There will be a small ceremony | ९४ वे साहित्य संमेलन ऑनलाईन अशक्य; परिस्थिती सुधारल्यास छोटेखानी सोहळा होणार

९४ वे साहित्य संमेलन ऑनलाईन अशक्य; परिस्थिती सुधारल्यास छोटेखानी सोहळा होणार

ठळक मुद्देनाशिक, अंमळनेर, दिल्ली आणि विदर्भातून साहित्य संमेलन घेण्याविषयी प्रस्ताव आले आहेतअवघ्या १५ दिवसांत साहित्य संमेलनाचे ठिकाण निश्चित करण्यापासून सगळी तयारी करू

औरंगाबाद : साहित्य संमेलन म्हणजे लेखक आणि रसिकांचा, साहित्यप्रेमींचा मेळावा. ऑनलाईन साहित्य संमेलनाचा पर्याय सुचविणारे अनेक आहेत; परंतु पुस्तक विक्री, लेखक-वाचकांची प्रत्यक्ष भेट हे ऑनलाईन संमेलनातून शक्य नाही. त्यामुळे ९४ वे साहित्य संमेलन झाले, तर ते छोटेखानी का असेना; पण प्रत्यक्षच होईल. ऑनलाईन पद्धतीने साहित्य संमेलन होणार नाही, असा खुलासा अखिल भारतीय मराठी साहित्य  महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना केला. 

सर्वकाही सुरळीत असते तर जानेवारी २०२१ मध्ये संमेलन होणे अपेक्षित होते; परंतु कोरोनामुळे आता संमेलनाच्या आयोजनाबाबतच प्रश्नचिन्ह आहे. नवा पर्याय स्वीकारत ऑनलाईन साहित्य संमेलन आयोजित करण्याच्या सूचना साहित्य महामंडळाकडे येत आहेत; परंतु अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी ऑनलाईनचा पर्याय अजिबातच अनुकूल नसल्याचे आणि ऑनलाईन आयोजन अर्थहीन असल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले की, कोरोनामुळे लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशात साहित्य संमेलन  घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यात साहित्य संमेलन होणार नाही. साहित्य  महामंडळ डिसेंबरपर्यंत वाट पाहणार आहे. त्यानंतर परिस्थिती सुधारत आहे, असे वाटल्यास अवघ्या १५ दिवसांत साहित्य संमेलनाचे ठिकाण निश्चित करण्यापासून सगळी तयारी करू आणि साहित्य संमेलन घेऊ. जानेवारीमध्ये साहित्य संमेलन घेण्यासंबंधी विचार करण्यात येईल.

या ठिकाणांहून आले आहेत प्रस्ताव
९४ वे साहित्य संमेलन झाले तर ते होणार कुठे, याविषयी साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. याविषयी विचारले असता ठाले पाटील म्हणाले की, नाशिक, अंमळनेर, दिल्ली आणि विदर्भातून साहित्य संमेलन घेण्याविषयी प्रस्ताव आले आहेत; परंतु हे प्रस्ताव कोरोनाची लाट येण्यापूर्वी आलेले आहेत. आता सर्वकाही  बदलून गेले आहे. त्यामुळे आलेल्या प्रस्तावांपैकीही किती जण आता साहित्य संमेलन घेण्यास उत्सुक असतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: 94th Literary Conference Online Impossible; There will be a small ceremony