बीड बायपासवरील ९२ अतिक्रमणे जमीनदोस्त; देवळाई चौक ते महानुभाव आश्रम रस्ता मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 20:16 IST2025-06-11T20:15:37+5:302025-06-11T20:16:56+5:30

मागील आठवड्यापासून बायपासवर सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू आहे.

92 unpaved and concrete encroachments on Beed Bypass demolished; Road completely clear from Devlai Chowk to Mahanubhav Ashram | बीड बायपासवरील ९२ अतिक्रमणे जमीनदोस्त; देवळाई चौक ते महानुभाव आश्रम रस्ता मोकळा

बीड बायपासवरील ९२ अतिक्रमणे जमीनदोस्त; देवळाई चौक ते महानुभाव आश्रम रस्ता मोकळा

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास रोडवर मंगळवारी दिवसभर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने पाडापाडी केली. दिवसभरात ९२ कच्ची आणि पक्की अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. काही ठिकाणी व्यापाऱ्यांकडून कडाडून विरोध झाला. विरोध मावळताच कारवाई करण्यात आली. मागील आठ दिवसांत ४१८ अतिक्रमणे काढण्यात आली. त्यामुळे देवळाई चौक ते महानुभाव आश्रमापर्यंत दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड मोकळा झाला आहे.

मागील आठवड्यापासून बायपासवर सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू आहे. ईदनिमित्त दोन दिवस मोहिमेला विश्रांती होती. मंगळवारी महानुभाव आश्रम चौकाकडून कारवाई सुरू करताच व्यापाऱ्यांचा मोठा जमाव जमला. आम्हाला वेळ द्या, अशी मागणी करीत कारवाईला कडाडून विरोध दर्शविला. काहीकाळ तणाव निर्माण झाला. अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी व्यापाऱ्यांना सांगितले की, ईदनिमित्त दोन दिवसांचा वेळ दिला होता, स्वत:हून अतिक्रमणे काढून घेणे अपेक्षित होते. आता कारवाई थांबणार नाही. विरोध मावळताच नागरिक मित्रपथकाने नागरिकांना बाजूला केले. त्यानंतर कारवाईला सुरुवात झाली.

दिवसभरात ९२ लहान-मोठी बांधकामे पाडण्यात आली. त्यांत दुकाने, संरक्षण भिंती, ओटे, टपऱ्या व दुकानांसमोरील शेडचा समावेश आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांकडून ६७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपायुक्त सविता सोनवणे, समीऊल्लाह, नगररचना विभागाचे उपअभियंता शिवाजी लोखंडे, सचिन कुमावत, इमारत निरीक्षक कुणाल भोसले, रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ, नागरी मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव यांच्या पथकाने केली.

Web Title: 92 unpaved and concrete encroachments on Beed Bypass demolished; Road completely clear from Devlai Chowk to Mahanubhav Ashram