छत्रपती संभाजीनगरच्या अंगणवाड्यांमध्ये ९ कोटींचा खरेदी घोटाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:27 IST2025-07-30T14:27:01+5:302025-07-30T14:27:42+5:30

या प्रकरणी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

9 crores procurement scam in Chhatrapati Sambhajinagar's Anganwadis! 'Show cause' notice issued to Deputy Chief Executive Officers | छत्रपती संभाजीनगरच्या अंगणवाड्यांमध्ये ९ कोटींचा खरेदी घोटाळा!

छत्रपती संभाजीनगरच्या अंगणवाड्यांमध्ये ९ कोटींचा खरेदी घोटाळा!

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाणी सुविधांसाठी प्लास्टिकची टाकी, फिल्टर तसेच स्वयंपाकगृहातील भांडे (किचन सेट) खरेदीमध्ये ९ कोटींची अनियमितता झाल्याची बाब उघड झाली आहे. दरम्यान, यासंदर्भात आमदार अनुराधा चव्हाण यांनी महिनाभरापूर्वी या प्रकरणांची माहिती जाणून घेण्यासाठी पत्र दिलेले असतानाही महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी मंगळवारी सुवर्णा जाधव यांंना दोन दिवसांत खुलासा सादर करा, या आशयाची कारणे दर्शक नोटीस बजावली आहे.

विशेष म्हणजे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव ह्या ३१ जुलैला सेवानिवृत्त होत आहेत. दुसरीकडे दोन दिवसांत या कारणे दर्शक नोटिसेचे समाधानकर उत्तर दिले नाही, तर शिस्तभंगाची कारवाईचा इशारा ‘सीईओ’ अंकित यांनी दिला आहे. त्यामुळे झेडपीत खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?
मावळत्या आर्थिक वर्षात शासनाने जलजीवन मिशन किंवा अन्य योजनांमार्फत ज्या अंगणवाड्यांना शुद्ध पाणीपुरवठ्याची सुविधा नाही. अशा ९७७ अंगणवाड्यांना प्लास्टिकची पाण्याची टाकी, फिल्टर, नळ व तोटी, स्टीलचे भांडी आदींच्या खरेदीसाठी प्रती अंगणवाडी १७ हजार रुपये, असा १ काेटी ६६ लाखांचा निधी दिला होता. खरेदीचे अधिकारी प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, यातील काही अंगणवाड्यांना सुवर्णा जाधव यांनी स्वत:च्या अधिकारातच निधीचा खर्च केला. अनेक अंगणवाड्यांमध्ये घाईघाईने टाकी, फिल्टर व अन्य साहित्य खरेदी केले. पण, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून अनेक ठिकाणी ते उपयोगातही आणलेले नाही.

दुसऱ्या योजनेत गतवर्षी अंगणवाड्यांना स्वयंपाकगृहातील भांडे (किचन सेट) खरेदीसाठी शासनाने ८ कोटींचा निधी दिला होता. त्यात जिल्ह्यातील १६४६ अंगणवाड्यांसाठी प्रत्येकी ४८ हजार रुपयांचा निधी खर्च करायचा होता. मात्र, अत्यंत निकृष्ट दर्जाची भांडी खरेदी करण्यात आली.

आमदारांनाही जुमानले नाही
पाणीपुरवठ्याची सुविधा आणि किचन सेट या दोन्ही योजनांतील खरेदीची सविस्तर माहिती आ. अनुराधा चव्हाण यांनी महिनाभरापूर्वी मागितली होती. मात्र, त्यासंदर्भात सातत्याने टाळाटाळ करण्यात आली. स्वत: सीईओ अंकित यांनीदेखील माहिती देण्याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांना सूचित केले होते. तेही त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. शेवटी सोमवारी आ. चव्हाण यांनी जि. प. मध्ये सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. मात्र, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव रजेवर गेल्यामुळे त्या बैठकीला हजर नव्हत्या. मंगळवारी त्या मुख्यालयात हजर झाल्या आणि सीईओंनी त्यांना नोटीस बजावली.

आ. चव्हाण काय म्हणाल्या
आ. अनुराधा चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पाणीपुरवठ्याचे तसेच किचन सेटचे साहित्य खरेदी करण्यासाठी नियमाप्रमाणे निविदा काढायला हव्या होत्या. त्या काढल्या नाहीत. यासाठी प्रशासकीय मान्यताही घेतलेल्या नाहीत. खरेदी प्रक्रियेत कोट्यवधीच्या अनियमितता झाल्या आहेत.

Web Title: 9 crores procurement scam in Chhatrapati Sambhajinagar's Anganwadis! 'Show cause' notice issued to Deputy Chief Executive Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.