छत्रपती संभाजीनगरात पडेगाव रोडवर ८५७ बांधकामे जमीनदोस्त; रस्ता २०० फूट रुंद झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 12:54 IST2025-07-05T12:53:44+5:302025-07-05T12:54:30+5:30

सोमवारी जळगाव रोडवर कारवाईचे नियोजन मनपाकडून करण्यात येत आहे.

857 bulidings demolished on Padegaon Road in Chhatrapati Sambhaji Nagar; Road widened to 200 feet | छत्रपती संभाजीनगरात पडेगाव रोडवर ८५७ बांधकामे जमीनदोस्त; रस्ता २०० फूट रुंद झाला

छत्रपती संभाजीनगरात पडेगाव रोडवर ८५७ बांधकामे जमीनदोस्त; रस्ता २०० फूट रुंद झाला

छत्रपती संभाजीनगर : पडेगाव रोडवर शुक्रवारी महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई केली. दिवसभरात २७२ अनधिकृत मालमत्ता जमीनदोस्त केल्या. दोन्ही दिवशी मिळून ८५७ बांधकामे पाडण्यात आली. आता रस्ता पूर्णपणे २०० फूट रुंद झाला आहे. शनिवार आणि रविवारी कारवाईला विश्रांती देण्यात आली आहे. सोमवारी जळगाव रोडवर कारवाईचे नियोजन मनपाकडून करण्यात येत आहे.

पडेगाव ते दौलताबाद टी पॉईंट हा राज्य महामार्ग असून, मनपा हद्दीत रस्त्याची रुंदी विकास आराखड्यानुसार ६० मीटर दर्शविण्यात आली आहे. या रस्त्यावर महापालिकेने मागील १० ते १५ वर्षांत मोठ्या प्रमाणात जमीन मालकांना टीडीआरही दिले आहेत. सध्या हा रस्ता ३० मीटर रुंद असून, उर्वरित ३० मीटर अंतरात पडेगाव आणि मिटमिटा येथे मोठ्या प्रमाणात बांधकामे करण्यात आली होती. एकाही बांधकामाला मनपाने परवानगी दिलेली नव्हती. गुरुवारी सकाळी १० वाजता या भागात कारवाईला सुरूवात करण्यात आली. पहिल्या दिवशी ५८५ कच्ची, पक्की अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. दहा पेक्षा अधिक दोन ते तीन मजली इमारतीही पाडल्या. शुक्रवारी सकाळी मिटमिट्याच्या पुढे कारवाईला सुरूवात झाली. सायंकाळपर्यंत मनपा हद्दीपर्यंत २७२ अनधिकृत मालमत्ता पाडल्या. बहुतेक ठिकाणी कम्पाऊंड, गेट, छोटे-मोठे बांधकाम होते. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनीही कारवाईची पाहणी केली. यावेळी अतिक्रमण हटाव विभागप्रमुख संतोष वाहुळे उपस्थित होते. कारवाईत महापालिकेचे ३५०, पोलिसांचे २५० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. कारवाईत २५ जेसीबी, ५ पोकलेन, १५ टिप्पर, २ रूग्णवाहिका, २ कोंडवाड्याची वाहने, २ अग्निशमन विभागाचे बंब, ५ इलेक्ट्रिक हायड्रॅालिक वाहने हाेती.

दोन जणांना अल्प मुदत
कादरी हॉस्पिटलच्या समोरील भाग रुंदीकरणात येत होता. रुग्णालयाच्या विनंतीवरून त्यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली. त्याचप्रमाणे फौजी धाब्याची संरक्षण भिंत, गार्डन बाधित होत होते. त्यांनी स्वत: अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची विनंती केली. त्यावरून त्यांना मुदत देण्यात आली.

दोन दिवस विश्रांती, सोमवारी जळगाव रोड?
१) शनिवारी मोहरम, रविवारी आषाढीनिमित्त पोलीस बंदोबस्त असतो. दोन दिवस कारवाईला विश्रांती द्यावी, अशी सूचना पोलिसांनी महापालिकेला केली.
२) पुढील दोन दिवस कारवाई होणार नाही. सोमवारी जळगाव रोड ६० मीटर रूंद करण्यासाठी कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे.
३) या रस्त्यावर वसंतराव नाईक चौक ते हर्सूल टी पॉईंटपर्यंत डाव्या बाजूने सर्व्हिस रोड आहे. विरुद्ध दिशेला सर्व्हिस रोड नाही. त्यासाठी कारवाई केली जाणार आहे. शुक्रवारी काळा गणपती मंदिरासमोरील अपघातानंतर हा रस्ता मनपाच्या अजेंड्यावर आला आहे.

Web Title: 857 bulidings demolished on Padegaon Road in Chhatrapati Sambhaji Nagar; Road widened to 200 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.