प्रकल्प दुरुस्तीसाठी हवेत ८४ कोटी
By Admin | Updated: December 5, 2014 00:52 IST2014-12-05T00:49:56+5:302014-12-05T00:52:39+5:30
उस्मानाबाद : कागदावर प्रकल्पांची संख्या भरमसाठ असली तरी त्या प्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली येत नाही. कारण कोल्हापुरी बंधाऱ्यांसोबतच पाझर तलाव, लघु प्रकल्प दुरूस्तील आले आहेत.

प्रकल्प दुरुस्तीसाठी हवेत ८४ कोटी
उस्मानाबाद : कागदावर प्रकल्पांची संख्या भरमसाठ असली तरी त्या प्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली येत नाही. कारण कोल्हापुरी बंधाऱ्यांसोबतच पाझर तलाव, लघु प्रकल्प दुरूस्तील आले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी आले तसे वाहून जात आहे. अशा दुरूस्तीस आलेल्या प्रकल्पांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडून तयार करण्यात आला आहे. ६९८ कामांसाठी तब्बल ८४ कोटी १९ लाख ५० हजार रूपये इतका निधी आवश्यक आहे.
जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून सातत्याने सरासरीच्या अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे यंदा तर ऐन हिवाळ्यात अनेक गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या उस्मानाबाद तालुक्यातील दोन गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच ३७ गावांमध्ये ६० जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. भविष्यात ही टंचाई आणखी तीव्र होवू शकते. ही बाब लक्षात घेवून पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तर दुसरीकडे टंचाईग्रस्त गावांमध्ये असलेल्या प्रकल्पांच्या दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे. कारण पावसाळ्यामध्ये कितीही पाऊस पडला तरी संबंधित प्रकल्पांमध्ये पाणीसाठा होत नाही. पाणी आले तसे वाहून जाते. त्यामुळे कागदावरील सिंचनाखालील क्षेत्राचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असले तरी प्रत्यक्ष याच्या विरूद्ध चित्र आहे. दरम्यान, सदरील चिंताजनक स्थिती लक्षात घेवून जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडून दुरूस्तीस आलेल्या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये १५४ पाझर तलावांची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वाधिक ३६ तलाव हे तुळजापूर तालुक्यातील असून उस्मानाबाद आणि भूम तालुक्यातील अनुक्रमे ३५, ३४ इतके आहेत. दुरूस्तीसाठी किमान १५ कोटी ६८ लाख ५० हजार रूपये इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच जिल्हाभरातील अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांचे गेट जागेवर नाहीत. तर काही ठिकाणच्या बंधाऱ्यांची पडझड झाली आहे. अशा बंधाऱ्यांची संख्या २१७ असून याच्या दुरूस्तीसाठी जवळपास १९ कोटी ५१ लाख रूपये खर्च लागेल, असे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता टी. एस. देवकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)४
मागील काही वर्षांमध्ये जिल्हाभरात सिमेंट नाला बांधाच्या कामावर भर दिला आहे. या बांधांच्या खोलीकरणासाठीही आता निधी आवश्यक आहे. लपा विभागाने ३२७ सिमेंट बांधाचे खोलीकरण प्रस्तावित केले आहे. यामध्ये उस्मानाबाद १२, तुळजापूर ९९, उमरगा ७३, लोहारा १५, कळंब ५४, परंडा ३१, भूम २७ आणि वाशी तालुक्यातील १६ कामांचा समावेश आहे. यासाठी ४९ कोटी रूपये लागणार आहेत.
पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार
४जिल्हाभरातील प्रकल्पांची अवस्था अत्यंत खराब आहे. त्यामुळे सोलापूरच्या धर्तीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पांच्या दुरूस्तीसाठी वाढीव निधी द्यावा, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा परिषद पदाधिकारी डॉ. नारनवरे यांची भेट घेणार आहेत. याबाबत जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीतही चर्चा झाली आहे.