८० हजार रुपये घेऊन दोन वधूंचे साथीदारांच्या मदतीने पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:28 IST2018-11-03T23:27:31+5:302018-11-03T23:28:21+5:30
८० हजार रुपये घेऊन विवाह करण्यासाठी तयार असलेल्या नियोजित वधूंनी साथीदारांच्या मदतीने फिल्मीस्टाईल धूम ठोकली. ही घटना बीड बायपासवर रात्री सात वाजेच्या सुमारास घडली.

८० हजार रुपये घेऊन दोन वधूंचे साथीदारांच्या मदतीने पलायन
औरंगाबाद : ८० हजार रुपये घेऊन विवाह करण्यासाठी तयार असलेल्या नियोजित वधूंनी साथीदारांच्या मदतीने फिल्मीस्टाईल धूम ठोकली. ही घटना बीड बायपासवर रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर हद्दीच्या वादात चिकलठाणा, मुकुंदवाडी आणि पुंडलिकनगर पोलीस अडकून पडले.
प्राप्त माहिती अशी की, राजस्थानमध्ये मुलींची संख्या कमी असल्याने तेथील विवाहेच्छुक पुरुष मंडळी पैसे देऊन मध्यस्थांमार्फत लग्न करण्यास तयार असतात. भिलवाडा (राजस्थान) येथील दोन जणांसोबत विवाह करण्यासाठी दोन महिलांनी मध्यस्थामार्फत तयारी दर्शविली होती. त्या नियोजित वधूंना वरांकडून ८० हजार रुपये देण्यात आले होते. विवाहासाठी त्या भिलवाडा येथे गेल्या. मात्र, वराकडील मंडळींनी हैदराबादेत विवाह करण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे ते सर्वजण भिलवाडा येथून टेम्पो ट्रॅव्हल्सने औरंगाबादमार्गे हैदराबादला जात होते. यावेळी टेम्पोत नियोजित दोन वर आणि दोन वधू, एक महिला आणि टेम्पोचालक एवढीच मंडळी होती. नियोजित वधूंपैकी एक सिडको एन-६ येथील, तर दुसरी अहमदनगर येथील रहिवासी आहे. टेम्पो ट्रॅव्हल बीड बायपासवर असताना नियोजित वधूंच्या साथीदारांनी त्यांचा टेम्पो अडविला. टेम्पो थांबताच टेम्पोतील नियोजित वधू खाली उतरल्या आणि नियोजित वरांना त्यांनी धक्काबुक्की करीत त्या दोघींनी त्यांच्यासह तेथून धूम ठोक ली. त्यानंतर काही अंतरावर पुढे गेल्यानंतर टेम्पोचालकाने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले आणि कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. तेव्हा हा गुन्हा शहर पोलिसांच्या हद्दीत घडल्याचे त्यांना समजले. त्यांनी याप्रकरणी पुंडलिकनगर अथवा मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार करण्याचे त्यांना सांगितले. पुंडलिकनगर आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळ कोणाच्या हद्दीत आहे, याचा शोध घेत होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद कोणत्याही ठाण्यात झाली नव्हती.