मराठवाड्यात ८ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; नांदेड,छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक तडाखा
By विकास राऊत | Updated: March 17, 2023 19:05 IST2023-03-17T19:05:11+5:302023-03-17T19:05:31+5:30
आठ जिल्ह्यांत या काळात ५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; या पावसाने चार जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला

मराठवाड्यात ८ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; नांदेड,छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक तडाखा
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ६ ते ८ व १४ ते १७ मार्च या काळात झालेल्या अवकाळी पावसाचा ८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. आठ जिल्ह्यांत या काळात ५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; या पावसाने २१ जनावरांचा जीव गेला आहे. हिंगोलीत वीज पडून एकाचा तर परभणीत तिघांचा असे चार जाण दगावले आहेत. २२ नागरिक जखमी झाले आहेत.
८ मार्च रोजीच्या अहवालानुसार जिरायत एक हजार हेक्टर, बागायत दोन हजार ५५ हेक्टर, तर १७ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले. हे सगळे नुकसान छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले होते. १४ ते १७ मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये १५२ हेक्टर तर नांदेडमध्ये सर्वाधिक ४ हजार ७९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ८ जनावरे, जालना ९, नांदेड जिल्ह्यात १५, तर हिंगोलीत ३, बीडमध्ये ३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना, नांदेड जिल्ह्यांत जास्त पाऊस झाला असून, पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. गहू, कांदा, हरभरा, फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे पीक हातून गेल्याने ते हवालदिल झाले आहेत.
संपाचा पंचनाम्यांवर परिणाम
मराठवाड्यातील ५४ हजार १७१ कर्मचारी संपावर आहेत. विभागातील ४५० मंडळातील तलाठी, मंडळ अधिकारी रजेवर असल्यामुळे प्राथिमक नुकसानीचा अहवाल ई-पाहणीच्या आधारे केला आहे. १४ मार्चपासून महसूल कर्मचारी संपावर आहेत. संपाचा शुक्रवारी चौथा दिवस होता. अद्याप संपावर तोडगा निघालेला नाही. याचा पडसाद विधानसभेत उमटले. विभागातील सर्व जिल्हाधिकारी तहसिलदार, एसडीएमच्या पथकांसह बांधावर पोहोचले. त्यांनी शेतकर्यांनी चर्चा केला.