जायकवाडी धरणाच्या उजवा कालवा दुरुस्तीसाठी ७५० कोटींचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 14:50 IST2025-03-01T14:46:22+5:302025-03-01T14:50:02+5:30
प्रादेशिक विभागात वाद निर्माण करणारे हे प्रकरण असून, कुठल्याही विभागाचे पाणी कमी होणार नाही: जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

जायकवाडी धरणाच्या उजवा कालवा दुरुस्तीसाठी ७५० कोटींचा प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगर : जायकवाडीच्या डाव्या कालव्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, उजवा कालवा अनेक ठिकाणी खराब स्थितीत असल्याने पिकांसाठी सोडलेल्या पाण्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे उजव्या कालव्याच्या दुरुस्तीला प्राधान्य असेल. यासाठी ७५० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जायकवाडीच्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कधी उपलब्ध करून दिला जाईल, यावर बोलताना विखे म्हणाले, ७५० कोटींचा प्रस्ताव दिला आहे. जायकवाडीमध्ये पाण्याची उपलब्धता आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल. भावली योजनेला स्थगिती देणार काय, ८० टक्के काम होत आले आहे. धोरणाच्या विरोधात ते काम आहे, यावर विखे म्हणाले, त्याचा आढावा घेण्यात येणार आहे.
कोकण विभाग करणार सर्वेक्षण
गोदावरी खोऱ्यात असणाऱ्या ६० टीएमसी पाण्यासाठी या भागात नदीजोड प्रकल्प राबविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आहे. त्या योजनेच्या डीपीआरसाठी ६४ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. तसेच सर्वेक्षणाचे काम कोकण विभागाला दिले असून, त्याचे कामही सुरू झाले आहे, असे मंत्री विखे यांनी सांगितले.
पाणी कमी होणार नाही
जायकवाडीची साठवण क्षमता ६० वरून ५८ वर आणण्याची शिफारस अभ्यास गटाने केली. यावर शासनाची भूमिका काय, यावर विखे म्हणाले, मी मंत्री होण्यापूर्वी हा अहवाल सादर झालेला आहे. त्यामुळे मेंढीगिरी समितीने कोणत्या निकषानुसार, कोणत्या आकडेवारीवरून ६० टक्के पाणी ठेवण्याचे निश्चित केले होते आणि अभ्यास गटाने कोणते निकष वापरले, याची माहिती घेत आहे. प्रादेशिक विभागात वाद निर्माण करणारे हे प्रकरण असून, कुठल्याही विभागाचे पाणी कमी होणार नाही, असे त्यांनी सांगितले.