सूरतहून कुरियरने बनावट नावावर नायलॉन मांजाच्या ६७२ गड्ड्या छत्रपती संभाजीनगरात आल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 17:25 IST2025-12-11T17:20:29+5:302025-12-11T17:25:01+5:30
मुजीब अहमदच्या भावाने बनावट नाव, पत्त्यावर मागितली होती ऑर्डर; गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

सूरतहून कुरियरने बनावट नावावर नायलॉन मांजाच्या ६७२ गड्ड्या छत्रपती संभाजीनगरात आल्या
छत्रपती संभाजीनगर : ऑक्टोबर महिन्यापासूनच शहरात सूरत व अन्य शहरांतून नायलॉन मांंजाची तस्करी सुरू होती. पतंग विक्रेता मुदस्सिर ऊर्फ मुजीब अहमद नजीर अहमदचा भाऊ समीर अहमद नजीर अहमद (रा. रोशन गेट) याने दोन वेळेस ऑर्डर दिली होती. त्यातील १ नोव्हेंबर रोजी शहरात आलेली ६७२ रिल्सची ऑर्डर न स्वीकारता कुरिअरच्या कार्यालयात तशीच राहू दिली होती. हे कळताच गुन्हे शाखेने मुकुंदवाडीत छापा मारून हा मुद्देमाल जप्त करत समीरसह त्याचा मेहुणा शेख फईम शेख नईम (रा. बाबर कॉलनी, कटकट गेट) याला अटक केल्याचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी सांगितले.
सोमवारी रात्रीतून पाच नायलाॅन मांजा विक्रेत्यांना अटक करत २०६ गट्टू जप्त करण्यात आले. यात काफिलउल्ला खान फजलउल्ला खान व शेख मुशीर अहमद अश्फाक अहमद (दोघे रा. शरीफ कॉलनी), शेख फरदीन अब्दुल रज्जाक (रा. शहाबाजार), तालेबखान शेरखान (रा. फातेमानगर), मुदस्सिर ऊर्फ मुजीब अहमद नजीर अहमद (रा. आजम कॉलनी, रोशन गेट) यांना अटक करण्यात आली होती.
१२ बॉक्सद्वारे नायलाॅन मांजा आला
मुकुंदवाडीतील कुरिअर कंपनीने पोलिसांशी संपर्क साधला. महिन्याभरापासून मागवलेल्या संशयास्पद कुरिअरबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक संदीप काळे यांनी कुरिअर तपासले असता त्यात १२ बॉक्समध्ये ६७२ रील आढळून आले.
भावानेच दिली ऑर्डर
कुरिअरच्या कार्यालयात आलेले सदर पार्सल प्रदीप पाटीलच्या नावे होते. पोलिसांनी पार्सलवरील मोबाइल क्रमांक तपासला असता तो युनूस कय्युम शेख कुरेशी (रा. आदर्शनगर, जाफराबाद) च्या नावे निघाला. पोलिसांनी त्याची चौकशी केली. हे सीमकार्ड त्याने फईमला वापरायला दिल्याचे सांगितले. फईमने त्याचा मेहुणा समीरला वापरायला दिल्याचे सांगितले. दोघांनाही अटक करण्यात आली. समीर हा अटकेतील मुदस्सिरचा सख्खा भाऊ आहे.
दोन वेळा आले पार्सल
कुरिअर कंपनीच्या माहितीनुसार प्रदीप पाटीलच्या नावे ऑगस्ट महिन्यातही पार्सल आले होते. तेही नायलॉन मांजाचेच असल्याचा संशय पोलिसांचा आहे. दुसरे पार्सल सूरतवरून २९ ऑक्टोबर रोजी पाठवले गेले होते.